ठाण्यासाठी  इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा विचार

मुंबई, 10 मार्च 2017:

ठाणे शहराची एकूण लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार 18 लाखांहून अधिक आहे. ही वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांच्या सोयीसाठी इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम विकसित करण्याबाबत विचार करण्यात येईल तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी अधिक बसेसचीही व्यवस्था करण्यात येईल,  असे नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी  विधान परिषदेत सांगितले.

विधानपरिषद सदस्य ॲड. निरंजन डावखरे, जयंत पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी उत्तर दिले.

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार

  • लोकसंख्येनुसार ठाणे शहरासाठी एकूण 700 बसेसची आवश्यकता
  • सध्या ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेकडील 445 बसेसपैकी दररोज सरासरी 264 बसेस प्रवाशांकरिता उपलब्ध
  • बृहन्मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका तसेच यासारख्या इतर महानगरपालिकांच्या परिवहन सेवेच्या सुमारे 300 बसेस ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात कार्यरत
  • महानगरपालिका क्षेत्रात महिला प्रवाशांकरिता राज्य शासनामार्फत तेजस्विनी बस योजना कार्यान्वित.

पुणे येथील वाढती लोकसंख्या पाहता पुणे, पिंपरी- चिंचवडसाठी स्वतंत्र परिवहन योजना राबविण्यात येते. त्याच धर्तीवर ठाणे येथेही अशी योजना राबविता येऊ शकते का, याचा अभ्यास करण्याचे निर्देश यावेळी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी संबंधित विभागाला दिले.