औरंगाबाद, 9 मार्च 2017/AV News Bureau:
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वैजापूर येथीस लोणी खुर्द येथे एकल महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तृतीयपंथी दिशा शेख यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित आशा केंद्र पुणतांबा, विकास अध्ययन केंद्र मुंबई आणि आधार बहुद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा घेण्यात आला होता. लहानपणापासून आमची जडणघडण ही एका स्त्री प्रमाणेच होत असल्याचे शेख यांनी सांगितले. सामाजिक कार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ युसूफ बेन्नूर यांनी मुस्लीम समाजातील महिला आणि ट्रिपल तलाक याविषयी माहिती दिली. शेतकरी कामगार पक्षाचे नेते काकासाहेब शिंदे यांनी मराठवाड्यातील दुष्काळ आणि महिलांच्या अडचणी याबाबत माहिती सांगितली. यावेळी ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त सुरेश शेळके, लोणीचे सरपंच रखीबचंद पाटणी, उपसरपंच वैशाली तांबे, ग्राम पंचायत सदस्य सुशीला पाटील, अंगणवाडी पर्यवेक्षक साळवे, अंगणवाडी सेविका शबाना शेख, जि.प. सदस्य सपना पवार, पंचायत समिती सदस्य अरुण सोनवणे, आधार बहुद्देशीय संस्थेचे शांताराम मगर, सोमनाथ तांबे आणि महिला उपस्थित होत्या. महिला दिनाच्या निमित्ताने ‘जागर’ या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन रेणुका कड यांनी केले. आभारप्रदर्शन शांताराम मगर यांनी केले.