लाचप्रकरणी प्रदूषण मंडळाचे अधिकारी अटकेत

ठाणे, 8 मार्च 2017/AV News Bureau:

औषध कंपनीला संमतीपत्र देण्यासाठी एक लाख 60 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ठाणे येथील महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी आणि फिल्ड अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी अटक केली

तक्रारदार यांच्या औषध कंपनीने संमती पत्र मिळविण्यासाठी ठाणे येथील महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या कार्यालयात अर्ज केला होता. येथील प्रादेशिक अधिकारी अशोक फुलचंद देशमाने (57) आणि अच्युत शेषराव नंदवटे (45) नी तक्रारदार यांच्याकडे संमती पत्र देण्यासाठी 1 लाख 60 हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदार यांनी ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली.

तक्रारीची पडताळणी करून मंगळवारी प्रदूषण मंडळाच्या ठाणे येथील कार्यालयात सापळा रचण्यात आला. त्यावेळी 1 लाख 60 हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. या दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक अंकुश बांगर यांनी दिली.