देशातील महत्त्वाच्या 91 जलसाठ्यातील पाण्याच्या पातळीमध्ये तीन टक्यांनी घट
नवी दिल्ली, 8मार्च 2017:
देशभरातील महत्त्वाच्या 91 जलसाठ्यांमध्ये 2 मार्चला संपलेल्या आठवड्यात 64.55 बीसीएम जलसाठा उपलब्ध आहे. हा जलसाठा एकूण साठवण क्षमतेच्या 41टक्के आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात यंदा पाणी साठा अधिक असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
देशातील एकूण पाणी साठयाचे प्रमाण हे गेल्या वर्षीच्या या काळातील तुलनेमध्ये 132 टक्के आहे तर गेल्या दहा वर्षांच्या सरासरीनुसार जलसाठ्याचे प्रमाण 102 टक्के आहे.
देशातील 91 जलसाठ्यांची एकूण पाणी साठवण्याची क्षमता 157.799 बीसीएम आहे. हे प्रमाण 253.388 बीसीएम या एकूण क्षमतेच्या जवळपास 62 टक्के आहे. 91 जलसाठ्यांपैकी 37 ठिकाणी जल विद्युत प्रकल्प उभारण्यात आले असून त्याद्वारे 60 मेगावॅटपेक्षा जास्त ऊर्जेची निर्मिती केली जाते.
गुजरात आणि महाराष्ट्राचा समावेश पश्चिम क्षेत्रामध्ये होतो. या क्षेत्रात 27 जलसाठे असून त्यांची एकूण 27.07 बीसीएम जलसाठा क्षमता आहे. या जलसाठ्यांमध्ये एकूण क्षमतेच्या 54 टक्के जीवंत जलसाठा सध्या उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच काळात 28 टक्के जलसाठा उपलब्ध होता. तर गेल्या दहा वर्षांची सरासरी पाहिली तर या काळात 50 टक्के जलसाठा उपलब्ध होता.
- समाधानकारक पाणीसाठा असलेली राज्ये
पंजाब, राजस्थान, झारखंड, ओदिशा, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, तेलंगण
- कमी पाणीसाठा असलेली राज्ये
हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू