रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले
मुंबई, 7 मार्च 2017 /AV News Bureau:
दलित आदिवासी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र प्रवर्ग करून जाट समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. तसेच जाट समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी हिंसक आंदोलन करून कायदा हातात घेऊन नये असे आवाहनही त्यांनी केले.
हरयाणा प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे रामदास आठवले यांचा पानिपत येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी जाहीर सभेत आठवले यांनी जाटांच्या आरक्षण लढ्याला पाठिंबा जाहीर केला. यावेळी हरयाणा रिपाइंचे प्रदेश अध्यक्ष अनिल बावा तसेच रिपाइंच्या उत्तर भारत च्या अध्यक्ष मंजू छिबेर आदी उपस्थित होते .
जाट समाजाच्या आरक्षणाच्या मागणीस हरयाणातील दलित पाठिंबा देतील. तसेच जाट समाजानेही दलितांच्या प्रश्नावर साथ दिली पाहीजे. दलित आणि जाट समाजाला एकत्र आणण्याचा रिपब्लिकन पक्षाचा प्रयत्न राहीला आहे. हरयाणातील दलित आणि जाट समाजाने एकत्र यावे असे आवाहनही आठवले यांनी केले.