ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती
नाशिक 4 मार्च 2017/AV News Bureau:
ई-पोर्टलच्या माध्यमातून महिला बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच बचतगटांसाठी विभागीय आणि फिरत्या विक्रीकेंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक आणि नाशिक विभागातील सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरे वसतीगृह मैदान येथे महिला स्वयंसहाय्यता बचत गट व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या भव्य वस्तुंचे प्रदर्शन आणि विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या विभागीय महिला मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री होते आणि त्याचा फायदा बचतगटातील सदस्यांना होतो. बचतगटांद्वारे अनेक चांगली उत्पादने केली जातात. अशा उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ऑनलाईन विक्री प्रक्रीया ‘आपले सरकार’ वेब पोर्टलला जोडून बचतगटाच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे,असेही त्यांनी सांगितले.
- सुमतीबाई सुकळीकर यांच्या नावाने शुन्य टक्के व्याजाने कर्ज
महिला संकटाच्यावेळी कुटुंबाची जबाबदारी सांभाळते. तीला सक्षम केल्यास समाजाचा विकास वेगाने होतो. म्हणूनच शासनाने बचतगट चळवळीला प्रोत्साहन देण्याची शासनाची भूमीका आहे. सुमतीबाई सुकळीकर यांच्या नावाने शुन्य टक्के व्याजदराने बचतगटांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उत्पादनाचे चांगले मार्केटींग आणि पॅकेजींग केले तर बचतगटाच्या माध्यमातून महिलांना अधिक लाभ मिळविता येईल, असे त्यांनी सांगितले.
- बचत गटांसाठी अस्मिता उपक्रमाचा प्रस्ताव
’अस्मिता’ उपक्रमाचा प्रस्ताव वित्त विभागाला सादर करण्यात आला आहे. त्याद्वारे बचतगटांना सॅनीटरी नॅपकीन व्यवसायासाठी सहकार्य करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद शाळेतील मुलींना सवलतीच्या दरात सॅनीटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या तीन वर्षात प्रत्येक गावात एका कुटुंबात किमान एक महिला बचतगटाशी जोडली जाईल असे प्रयत्न ग्रामविकास विभागातर्फे करण्यात येतील, असे मुंडे यांनी सांगितले.