मुंबईचा महापौर 8 मार्चला ठरणार

मुंबई, 1 मार्च 2017/AV News Bureau:

मुंबई महापालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये जोरदार लढाई सुरू असून येत्या 8 मार्च रोजी होणाऱ्या महापौर निवडीने याचा फैसला होणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करीत आहे.

मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी 8 मार्च रोजी दुपारी 12 वाजता निवडणूक होणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक संपली असली तरी अद्याप सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. पुरेशा संख्याबळाअभावी सत्तेचा रथ अडकून पडला आहे.मात्र विदयमान पालिका सभागृहाची मुदत 8 मार्चला संपत आहे. त्यामुळे 8 मार्चला महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक होईल.

नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला 84 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपने जोरदार मुसंडी मारत 82 जागा काबीज केल्या आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांना सत्ता स्थापनेसाठी समान संधी आहे.  या दोन्ही पक्षांव्यतिरिक्त काँग्रेसला 31, राष्ट्रवादी काँग्रेसला 9 , मनसेला 7, एमआयएमला 3, समाजवादी पक्षाला 6 आणि अखिल भारतीय सेनेला 1 जागा मिळाली आहे.  त्यामुळे महापौर पद मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजप कोणती रणनिती आखतात  आणि कोणत्या पक्षाला सोबत घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.