ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे
नाशिक, 27 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
जागतिकीकरणात नवीन तंत्रज्ञानामुळे मराठी भाषेबरोबरच अन्य भाषांपुढेही मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत. अशा परिस्थितीत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी केवळ साहित्य संमेलन आणि मराठी भाषा दिनाचे औचित्य ठेवून विचारमंथन व्हायला नको. व्यवहार भाषा कोणतीही असली माय मराठी ही काळजातील भाषा असल्याने तिला आपल्या हृदयात कायमचे स्थान द्यायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महारष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यापीठातर्फे रविवारी राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला कालिदास कलामंदिरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
कुसुमाग्रजांनी जीवनभर मराठी भाषेसाठी विविध उपक्रम घेतले. म्हणूनच तात्यासाहेबांची कविता रेशनकार्डवर गेली. याच नाशिकमधून अनेक ज्ञानपीठ विजेत्यांनी विचारमंथन केले. मराठीची प्रतिष्ठा वाढायला हवी. ती भाषेच्या संवार्धानातूनच वाढेल असेही कांबळे म्हणाले.
या विशेष समारंभात तीन कवींना सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने काव्य लेखनासाठी देण्यात येणारा २०१६ चा विशाखा काव्यलेखन पुरस्कार डॉ. योगिनी सातारकर-पांडे (नांदेड) यांच्या ‘जाणिवांचे हिरवे कोंभ’ काव्यसंग्रहास रु. प्रथम पुरस्कार, मोहन कुंभार (सिंधुदुर्ग) यांच्या ‘जगण्याची गाथा’ काव्यसंग्रहास द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार तर विष्णू थोरे (नाशिक) यांच्या ‘धुळपेरा उसवता’ काव्यसंग्रहास तृतीय क्रमांकाचा पुरस्कार उत्तम कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कारार्थीना अनुक्रमे २१ हजार, १५ हजार, आणि १० हजार रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, विद्यार्थी कल्याण व बहि:शाल विभागाच्या प्रमुख डॉ. विजया पाटील, वित्त अधिकारी मगन पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर होते.