मालगाडी घसरल्याने हार्बर विस्कळीत

good train

मुंबई, 27 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

ऐन गर्दीच्यावेळी हार्बर मार्गावरील जीटीबी नगर रेल्वे स्थानकाच्या हद्दीत आज पहाटे सव्वा चारच्या सुमारास मालगाडीचे डबे घसरल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आणि कामावर जाणाऱ्या नोकरदारवर्गाचे हाल झाले. घसरलेले डबे हटविण्यात आले असून रेल्वे सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

मालगाडी घसरल्यामुळे हार्बरमार्गावर सीएसटी ते कुर्ला दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मात्र कुर्ला आणि वाशी, बेलापूर, पनवेल तसचे सीएसटी ते वांद्रे, अंधेरीदरम्यानची सेवा चालू ठेवण्यात आली. हार्बर सेवा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना मेन लाईनवरून प्रवासाची मुभा देण्यात आली. तसेच बेस्ट बसचीही मदत घेण्यात आली आहे.

 सकाळी कामावर जाणाऱ्या लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. ऐन गर्दीच्यावेळी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टच्या जादा गाड्या मागविण्यात आल्या. कुर्ला ते वडाळा मार्गावर 4  आणि ट्राँबेकडे जाण्यासाठी 2 अतिरिक्त बस गाड्या चालविण्यात आल्या. त्याचप्रमाणे कुर्ला येथे अडकलेल्या हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी कुर्ला ते सीएसटीदरम्यान विशेष बस गाड्या चालविण्यात येत आहेत.

याशिवाय मध्य रेल्वेने सीएसटी ते अंधेरी,कुर्ला, पनवेल-वाशी/ठाणे आणि कुर्ला-पनवेलसाटी अतिरिक्त गाड्या चालविण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.