कोकण रेल्वे मार्गावर लोखंडी तुकडा सापडला

kokan railway fish plate-1

खारेपाटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

नवी मुंबई, 14 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

कोकण रेल्वेमार्गावर राजापूर- वैभववाडी रेल्वे स्थानकांच्यादरम्यान खारेपाटण परिसरात रेल्वे रुळावर असलेला लोखंडी तुकडा (फिश प्लेट) मालगाडीखाली आल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. याप्रकरणी खारेपाटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावरून मालगाडी जात होती. मालगाडीच्या चाकाखाली काहीतरी आल्याचे लक्षात आल्यावर चालकाने गाडी लगेच थांबवून रेल्वे रुळावर पाहिले असता त्यांना फिश प्लेटचा तुकडा आल्याचे दिसून आले. मालगाडीच्या मोटरमनने सतर्कता दाखविल्यामुळे दु्र्घटना टळली. याप्रकरणी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी दिली.

मालगाडीच्या मोटरमनने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने या घटनेची माहिती दिली.  याप्रकरणाची गंभीर दखल घेत खारेपाटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेचे रत्नागिरी येथील प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक बी. निकम यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर अडथळे निर्माण करण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामागे घातपाताची शक्यता आहे का, याबाबत सखोल तपास सुरू आहे. सततच्या उघड होणाऱ्या या घटनांमुळे कोकण रेल्वे मार्गावरही सतर्कता बाळगण्यात येत आहे. कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे पोलीस बल तसेच कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून नियमित तपासणी करण्यात येत असल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

गेल्या काही दिवसांमध्ये रेल्वे मार्गावर अडथळे निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न उघडकीस आले आहेत.त्यामध्ये  7 फेब्रुवारी रोजी  कळंबोली परिरात नेवाडे फाटा येथे अशाचप्रकारे रेल्वे रुळावर लोखंडी तुकडा टाकल्याचे आढळून आले होते. त्यावेळी पुणे –सात्रांगाची एक्सप्रेसचे मोटरमन पाटील यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली होती. 8 फेब्रुवारी रोजी पनवेल- जेएनपीटी रेल्वे मार्गावर आज पहाटे चारच्या सुमारास मालगाडी जात होती. त्यावेळी मालगाडीच्या मोटरमनला रेल्वे मार्गावर 7-8 फूट लांबीचा विद्युत खांब आढळून आला. साधारणपणे 100 ते 150 किलो वजनाचा पोल आढळून आल्यामुळे मोटरमनने लगेचच गाडी थांबविली आणि रेल्वे अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. तर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात जनशताब्दी एक्सप्रेसच्या मार्गावरही अशाचप्रकारे लोखंडी तुकडा टाकलेला आढळून आला होता.