मुंबई,12 फेब्रुवारी 2017:
दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील 22 टक्के कार्यक्रमांमध्ये तंबाखूजन्य उत्पादनाचा वापर प्रदर्शित होत असून त्यापैकी 71 टक्के कार्यक्रम बालके आणि किशोरवयीन मुलांच्या पाहण्यात येतात. त्यामुळे सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन अधिनियमांतर्गत चित्रपट नियमाच्या अंमलबजावणी संदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक अभ्यास कार्यक्रम राबवला. या अभ्यासातून देशातील नागरिकांवर चित्रपट उद्योगाचा मोठा प्रभाव जाणवत असल्याचे दिसून आले.
या संदर्भात शुक्रवारी मुंबईत झालेल्या चर्चेत आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव सी.के.मिश्रा सहभागी झाले. तंबाखूमुळे त्याचे सेवन करण्याच्या आयुष्यातील महत्वाचा काळ वाया जातो. हे थांबवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तंबाखूचे दुष्परिणाम सांगत त्याच्या वापरावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
तंबाखू विक्रेत्यांनी तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत ग्राहकांना इशारा दिला पाहिजे अशी अपेक्षा माहिती आणि प्रसारण सचिव अजय मित्तल यांनी व्यक्त केली. तर चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवल्यानंतर तंबाखू विरोधी संदेश देणाऱ्या ध्वनीचित्रफिती प्रदर्शित केल्या जाव्यात अशी सूचना सीबीएफसीचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी केली.
तंबाखूजन्य उत्पादने लोकप्रियतेचे निदर्शक असल्याचे भासवून तंबाखू उद्योग ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचे व्हायटल स्ट्रॅटेजीच्या संचालक डॉ. नंदिता मुरुकुटीया यांनी यावेळी सांगितले.
- भारतातील तंबाखूचा वापर वाढती समस्या
जागतिक सर्वेक्षणानुसार, 15 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील 35 टक्के व्यक्ती विविध माध्यमातून तंबाखूचे सेवन करतात. ग्रामीण भागात पाच पैकी दोन तर शहरी भागात चार पैकी एक व्यक्ती तंबाखूचे सेवन करते. 20 कोटीपेक्षा जास्त भारतीय अशाप्रकारे तंबाखूचे सेवन करत असल्याचे या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. धूररहित तंबाखू उत्पादनांमध्ये गुटखा, जर्दा, पानमसाला, तंबाखूसह पान आणि खैनीचा समावेश आहे.