मुंबई, 10 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
मध्य रेल्वेच्या गाड्यांमध्ये आपला व्यवसाय तसेच उत्पादनांच्या जाहिरातबाजीची पत्रके लावणाऱ्यांवर मध्य रेल्वे प्रशासनाने कायदेशीर कारवाई करीत 4 लाख 25 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मुंबईची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या लोकलमधून दररोज लाखो मुंबईकर कामाधंद्यानिमित्त प्रवास करीत असतात. यामुळे अनेकजण आपल्या व्यवसाय तसेच उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी रेल्वे गाड्यांच्या डब्यांमध्ये पत्रके लावतात. याशिवाय विविध समस्यांवर उपाययोजना करण्याची आश्वासने देणाऱ्या अनेक तांत्रिक बाबांच्या जाहीरातीही झळकत असतात. अशाप्रकारे जाहिरातबाजी करून गाड्या विद्रुप करणाऱ्यांविरोधात मध्य रेल्वेने गेल्या वर्षभरात विशेष मोहिम राबविली. या मोहिमेअंतर्गत बेकायदेशीर जाहिरातबाजीची 513 प्रकरणे समोर आली. ज्यामध्ये 14 प्रकरणे वैयक्तिक कर्ज देणाऱ्या तसेच तांत्रिक बाबांच्या 26 प्रकरणांचा समावेश आहे. या अनधिकृत जाहिरातबाजी करणाऱ्यांविरोधात रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून 4 लाख 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.