इलेक्ट्रीकवर चालणा-या नवीन 65 बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव
नवी मुंबई, 10 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचा सन 2016-17 चा रु. 240 कोटी 51 लक्ष 13 हजार जमा आणि रु. 240 कोटी 43 लक्ष 28 हजार खर्च व रु. 7 लक्ष 85 हजार शिल्लक रक्कमेचा सुधारित व सन 2017-18 चा मूळ रु. 309 कोटी 79 लक्ष 80 हजार जमा व रु. 309 कोटी 73 लक्ष 40 हजार खर्चाचा आणि रु. 6 लक्ष 40 हजार शिल्लकीचा अर्थसंकल्प, परिवहन व्यवस्थापक शिरिष आरदवाड यांनी परिवहन समिती सभापती मोहन म्हात्रे यांना आज सादर केला.
अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ठये खालील प्रमाणे.
1) वातावरणातील प्रदुषण कमी करण्यासाठी शासनाकडून जनतेस प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने उच्च तंत्रज्ञानयुक्त अत्याधुनिक सुविधासह विद्युतवर (इलेक्ट्रीक) चालणा-या किंवा कमी प्रदुषण करणा-या डिझेलवर चालणा-या नवीन 65 बसेस या आर्थिक वर्षात खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे.
2) महाराष्ट्र शासन व सिडको लि. यांचेकडून नवी मुंबईतील बांधकामास 1.5 चटईक्षेत्र निर्देशांक मंजूर करण्यात आला आहे. त्यामूळे उपक्रमाच्या ताब्यात असलेले वाशी, सी.बी.डी. व रबाळे येथील बस टर्मिनस व आगार व्यापारी तत्वावर महानगरपालिकेच्या निधीतुन विकसित करण्यात येणार आहे.
3) केंद्र शासनाने जलवाहतुकीचे अन्यसाधारण महत्व विचारात घेऊन जलवाहतुकीस प्रोत्साहन देण्याचे धोरण जाहिर केले आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने नवी मुंबई महानगरपालिकेस बेलापुर ते मुंबई व उरण असे दोन प्रवासी जलवाहतुक मार्ग तांत्रिक दृष्टया शक्य असलेला अहवाल नवी मुंबई महानगरपालिकेस सादर केला आहे. ही सेवा परिवहन उपक्रमामार्फत चालविण्यासाठी या आर्थिक वर्षात तरतूद केलेली आहे.
4) केंद्र शासनाच्या MORTH च्या आर्थिक सहाय्याने रबाळे आगार येथे अत्याधुनिक सेवासुविधा सह असे चालक प्रशिक्षण केंद्र बांधण्याचे प्रस्तावित आहे.
5) ITS प्रणालीद्वारे उपक्रमाच्या सर्व बस मार्गावर नियंत्रण ठेऊन प्रवाशांना वेळेसंदर्भात माहिती उपलब्ध करुन देणे तसेच बसच्या फेऱ्यांवर प्रभावि नियंत्रण ठेवणे.
6) परिवहन उपक्रमातील आधिकारी/कर्मचारी यांना आणि कुंटुबीयासाठी वैद्यकीय विमा योजना लागु करणे.
7) बस आगार व बस टर्मिनस आवारात ATM बसविण्याकरिता भाडेतत्वावरती जागा देणे.
बस खरेदी, जलवाहतुक, टर्मिनस विकास या करिता लागणारा निधी नवी मुंबई महानगरपालिकेकडुन अनुदान स्वरुपात उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी सन 2017-18 करिता परिवहन उपक्रमाच्या अर्थसंकल्पात रु. 100 कोटी रक्कमेची तरतूद करण्यात आली आहे.