नवी मुंबई, 9 फेब्रुवारी 2017 /A News Bureau:
नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने एक लाखापेक्षा अधिक मालमत्ता कर थकविणाऱ्या 21 थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
मालमत्ता कर विभागातर्फे 1 लाखापेक्षा अधिक मालमत्ताकर थकबाकी असणा-या 10006 थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यापैकी 1717 मोठ्या थकबाकीदारांना थकबाकीसह मालमत्ता कर भरण्यासाठी 48 तासांची नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यापैकी मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर थकविणा-या 21 थकबाकीदारांची आज मालमत्ता अटकावणी / जप्ती करण्यात आली आहे.
या थकबाकीदारांना आपली रक्कम भरणा करण्यासाठी 31 डिसेंबर 2016 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. अशाचप्रकारे मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात अटकावणी / जप्तीची कारवाई टप्प्या-टप्प्याने सर्वच थकबाकीदारांवर करण्यात येणार असून नागरिकांनी आपली नवी मुंबई महानगरपालिकेकडील कराची थकबाकी तत्परतेने भरणा करावी व कायदेशीर कटू कारवाई टाळावी असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.