ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संशयित बँक खाती, वाहनांवर नजर
ठाणे, 8 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
निवडणुकीच्या काळात एखाद्या व्यक्तीने 3 लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम जवळ बाळगल्यास त्याच्याविरूद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना देतानाच मतदारांना प्रभावित करण्यासाठी कितीही रकमेचे वाटप केले तर त्यांच्याविरूद्ध कडक कारवाई करण्यात यावी असे निर्देश ठाणे महापालिकाआयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने आज महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समितीची बैठक महापालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीस अतिरिक्त पोलिस आयुक्त मकरंद रानडे, ठाणे विभागाचे आयकर आयुक्त सुभाषचंद्र, महावितरणचे मुख्य अभियंता करपे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पाटील, विशेष पोलिस शाखेचे उपायुक्त स्वामी, उपायुक्त ओमप्रकाश दिवटे, संदीप माळवी, आरटीओ विभागाचे अधिकारी, लिड बँकेचे राजन जोशी, विक्रीकर अधिकारी आदी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये जयस्वाल यांनी आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी संवेदनशील भागांसाठी विशेष पोलीस व्यवस्था करणे, रोख रकमेच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे, बँकांमधील संशयित व्यवरावर नजर ठेवणे, रात्रीच्यावेळी येणा-या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी भरारी पथाकांबरोबरच स्थानिक पोलिसांची मदत घेणे आदी महत्वाच्या सूचना दिल्या. तसेच पोलिसांनी आचारसंहिता काळात प्रतिबंधक कायद्यातंर्गत किती गुन्हे दाखल केले, आरटीओ विभागाने किती वाहनांवर कारवाई केली याचा अहवाल रोज देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपस्थित असलेले लिड बँकेचे राजन जोशी यांना बँकेमध्ये होणा-या संशयित व्यवहारावर नजर ठेवण्याच्या सूचना देवून अशी घटना घडली तर तात्काळ त्यांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस विभाग किंवा आयकर विभागाच्या अधिका-यांना कळविण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, नियमानुसार दिलेल्या परवानगीपेक्षा उमेदवारांनी जास्त गाड्यांवर झेंडा लावल्याचे आढळल्यास आणि नियमानुसार तीन वाहनांपेक्षा जास्त वाहने उमेदवाराकडे आढळल्यास त्याविरूद्ध आरटीओ विभागाने कारवाई करावी तसेच त्याचा खर्च त्या उमेदवाराच्या खर्चात धरण्यात यावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच ज्या रस्त्यांवर रोड शोमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार आहे किंवा वाहतूक कोंडी होणार आहे अशा रस्त्यांवर रोड शोला परवानगी देण्यात येणार नसल्याचेही जयस्वाल यांनी या बैठकीत स्पष्ट केले.