नवी मुंबई, 6 फेब्रुवारी 2017 AV News Breaue:
आपल्या नैसर्गिक अवीट गोडीने खवय्यांच्या तोंडाला पाणी आणणारा हापूस आंबा मुंबईकरांसाठी उपलब्ध झाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फळ बजारात आज हापूस आंब्याच्या 110 पेट्या दाखल झाल्या आहेत. हापूस आंबा बाजारात दाखल झाल्यावर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हातून हा आंबा आला आहे. पाच ते आठ हजार रूपये पेटी असा या आंब्याच्या दर आहे.
जानेवारी महिन्यात आलेल्या थंडीच्या लाटेने हापूसच्या झाडांचा मोहोर गळून गेला होता. त्यामुळे आंबा उत्पादक आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र हापूसच्या पेट्या मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागल्यामुळे बाजारात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
जानेवरी महिना सुरू झाला की, हापूसचे वेध लोकांना लागतात. कोकणातील हापूस आंब्याच्या नैसर्गिक गोडीमुळे त्याला साता समुद्रापार प्रचंड मागणी असते. गेल्या काही वर्षांत हापूसकडे नगदी पिक म्हणूनही पाहीले जात आहे. मात्र यंदा जानेवारी महिन्यात आलेल्या थंडीच्या लाटेत हापूसचा मोहोर टिकाव धरणार नाही, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र हापूसच्या आजच्या आवकमुळे व्यापाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. एकाच दिवशी शंभरपेक्षा अधिक हापूसच्या पेट्या दाखल झाल्या असून सर्व आंबा मुंबईला रवाना करण्यात आहे. या हापूसच्या पेटीला दरही पाच हजारापासून आठ हजारापर्यंत मिळाल्याची माहिती ज्येष्ठ व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.