रस्ते विस्तारीकरणासाठी 21 हेक्टरवरील कांदळवने हटविणार

kharphuti

2018 पर्यंत चार मार्गांचे सहा व आठ पदरीकरण

स्वप्ना हरळकर/AV News :

नवी मुंबई, 31 जानेवारी 2017:

प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदराचे चौथे टर्मिनल, न्हावा शेवा शिवडी सी लिंक, कोस्टल रोड यामुळे नवी मुंबई, रायगड भागात वाहनांची प्रचंड वर्दळ सुरू होणार आहे. यापार्श्वभूमीवर सध्याचे दुपदरी रस्ते २०१८ पर्यंत चार टप्यांत सहा आणि आठ पदरी करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र हे काम करताना उरण, पनवेल तालुक्यांतील तेरा गावांमधील तब्बल 21 हेक्टरवरील विस्तिर्ण कांदळवने हटविली जाणार आहेत. ही कांदळवने डहाणू आणि उरणच्या काही भागात पुन्हा लावण्यात येणार असल्याचा दावा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) केला आहे.

रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 4 बी आणि राष्ट्रीय महामार्ग 348 (पूर्वीचा राज्य मार्ग 48 व आम्र मार्ग), 348 A आणि  554 हे रस्ते सहा आणि आठ पदरी करण्यात येणार आहे. यासाठी 2 हजार 50 कोटी खर्च करण्यात येणार आहे. मात्र या रस्त्यांच्या विस्तारीकरणाच्या जागेवर 21 हेक्टरवर कांदळवने आहेत. कोळखे, नांदगाव, वडघर, पनवेल, कामोठे, उलवे, सोनखार, तरघर, खारखलाटी, धुतुम, पौंडघर, पागोटे, करळ या गावांतील 21.7845 हेक्टर वरील कांदळवने हटविण्यात येणार आहेत. एनएचएआयने ही कांदळवने तोडण्याची उच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. न्यायालयाने अटी व शर्तीनुसार खारफुटी तोडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे हे काम  फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे जनरल मॅनेजर (तांत्रिक) आणि प्रकल्प संचालक प्रशांत फेगडे यांनी दिली.

amra marg near nmmc hq1

  • पालिकेसमोरचे सुशोभिकरणही विस्तारीकरणाच्या प्रक्रियेत जाणार 

एनएचएआयच्यावतीने सध्या गव्हाण फाटा ते किल्ला जंक्शन या 6.2 किलोमीटर लांबीच्या आम्र मार्गाचे विस्तारिकरणाचे काम सुरू केले आहे. सध्या दुपरी असलेला हा मार्ग आठ पदरी करण्यात येणार आहे. तसेच दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड बांधण्यात येणार आहे. त्यासाठी 171 झाडे तोडण्याबरोबरच 671 झाडे स्थलांतरीत करण्यात येणार आहेत. याशिवाय किल्ला जंक्शन येथे उड्डाणपूल बांधला जाणार आहे. नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील उद्यान तसेच पालिका मुख्यालयाच्या सर्व्हिस रोडच्या बाजूला असलेले सुशोभिकरणही या रस्ते विस्तारीकरणाच्या कामादरम्यान तोडला जाणार असल्याचे एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे. याबाबत एनएचएआयच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचेही पालिका अधिका-यांनी सांगितले.