काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची माहिती
मुंबई दि. २८ जानेवारी २०१७/AV News Bureau:
आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत स्थानिक पातळीवर चर्चा सुरू आहे. बहुतांश ठिकाणची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. याबाबत एक-दोन दिवसांत अधिकृत घोषणा केली जाईल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.
टिळक भवन येथे आज महाराष्ट्र प्रेदश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली राज्य निवड मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांच्या निवडीवर चर्चा झाली.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले की, धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन जातीयवादी पक्षाला फायदा होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी व्हावी, अशी आमची इच्छा आहे. आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले आहेत. ठाणे महापालिकेत आघाडीची चर्चा जवळ जवळ पूर्ण झाली आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल. तर पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी सन्मानपूर्वक तोडगा निघाल्यास आघाडी केली जाईल, असे खा. अशोक चव्हाण म्हणाले.
आजच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, विधान परिषदचे उपसभापती माणिकराव ठाकरे,माजी खासदार तसेच ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार, माजी मंत्री नसीम खान, मधुकर चव्हाण, बसवराज पाटील, आमदार विजय वडेट्टीवार, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चारूलता टोकस, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आ. एम. एम. शेख, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, प्रदेश सरचिटणीस ऍड. गणेश पाटील, राजेश शर्मा, सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत, रामकिशन ओझा, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.