शुल्कवाढीविरोधात वाहतूकदार संघटनांचा संपाचा इशारा

परिवहन विषयक सेवांच्या शुल्कवाढीचा फेरविचार करावा

परिवहन मंत्र्यांची केंद्राकडे विनंती

मुंबई, दि. 27 : परिवहनविषयक विविध सेवांच्या शुल्कांमध्ये केंद्र शासनामार्फत करण्यात आलेल्या वाढीविरोधात विविध वाहन चालक – मालक संघटनांनी ३१ जानेवारी २०१७  रोजी संप करण्याचा इशारा दिला  आहे. त्यामुळे या शुल्कवाढीचा फेरविचार करण्यात यावा, अशी विनंती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्राद्वारे केली आहे. शुल्कवाढीचा फेरविचार करण्यासंदर्भात केंद्र शासनाशी संपर्क साधला असून वाहन चालक – मालक संघटनांनी आपला प्रस्तावित संप मागे घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री रावते यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम क्रमांक ३२ व ८१ नुसार परिवहनविषयक विविध सेवांच्या शुल्कांमध्ये वाढ करण्यात आली आहे. या शुल्कवाढीविरोधात रिक्षा, टॅक्सी, ट्रक, टेम्पो, बस, स्कूल व्हॅन, टँकर यांच्या चालक व मालक संघटनांनी येत्या ३१ जानेवारी रोजी संप करण्याचा इशारा दिला आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु असून त्या पार्श्वभूमीवर हा संभाव्य संप झाल्यास राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे परिवहनविषयक विविध सेवांच्या शुल्कांमध्ये करण्यात आलेल्या वाढीचा फेरविचार करण्यात यावा, अशी विनंती मंत्री रावते यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना केली आहे.