मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
भारतीय अर्थव्यवस्थेत सीमा शुल्क विभागाचे महत्वाचे योगदान
मुंबई,27 जानेवारी 2017 /AV News Bureau:
भारतीय अर्थव्यवस्थेत सीमा शुल्क विभागाचे मोलाचे योगदान आहे. करचुकवेगिरी, गैरव्यवहार यांना आळा घालण्यासह महसूल वृद्धीसाठी अद्ययावत तंत्रज्ञान उपयुक्त असून त्याच्या वापरावर भर द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात सीमा शुल्क विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय कस्टम डे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी यावेळी गोदरेज कंपनीचे चेअरमन आदी गोदरेज, मुंबई सीमा शुल्क विभागाचे आयुक्त राजीव टंडन, माजी सनदी अधिकारी जॉनी जोसेफ, देवेंद्र सिंग, केंद्रीय आदिवासी विभागाचे सहसचिव राजेश अग्रवाल आदी उपस्थित होते.
करचुकवेगिरी, गैरव्यवहार यांना आळा घालणे, माहितीचे अचूक संकलन करुन त्याआधारे तपास करणे हे आव्हान पेलण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. रेल्वे, जल, हवाई या मार्गांनी आयात आणि निर्यात होणाऱ्या मालवाहतूकीच्या कार्यात सुसूत्रता आणण्यासाठी या अधिकाधिक सेवा ऑनलाईन झाल्या पाहिजेत. त्यामुळे अवैध व्यवसायांचाही अचूक शोध घेण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
सीमा शुल्क विभागाने गेल्या पाच वर्षांत जवळपास 70 हजार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांनी अधिकारी व कर्मचा-यांचे अभिनंदन केले. विभागातील उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त अधिका-यांना यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.