देवदेवतांच्या फोटोंवर बंदी घालणारे परिपत्रक रद्द

शिवसेनेच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई,27 जानेवारी 2017/Avirat Vaatchal News :

मंत्रालयासह राज्यातील शासकीय व निमशासकीय  कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये लावण्यात आलेले देवदेवतांचे फोटो काढून टाकण्याबाबतचे परिपत्रक तातडीने रद्द करण्याची शिवसेनेची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच मान्य केली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेवून याबाबतची नाराजी व्यक्त केली होती.

26 जानेवारीला शिवसेनेच्या जाहीर सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची युती तोडण्याची घोषणा केल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मागणी तातडीने मान्य करून मुख्यमंत्र्यांनी वातावरण निवळवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

देवदेवतांची चित्रे काढून टाकण्याबाबतच्या शासनाच्या परिपत्रकाबद्दल नाराजी व्यक्त करीत शिवसेनेचे शिष्टमंडळ सकाळीच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थी गेले. सुभाष देसाई, रामदास कदम, दिवाकर रावते, डॉ. दिपक सावंत आदींच्य नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सदर परिपत्रक तातडीने रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर ज्याला अधिकार नाही, त्या ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्याने हे परिपत्रक काढले आहे, हे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाचे नाही, त्यामुळे ते रद्द करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने हा खोडसाळपणा करणाऱ्या व जनतेच्या भावनेचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीदेखील चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शिवसेनेतर्फे देण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती न करण्याची घोषणा केल्यामुळे भाजप कोणती रणनिती आखणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाची भेट घेवून त्यांच्या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे भविष्यात दोन्ही पक्षांच्या तारा पुन्हा जुळतील का, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहे.