राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती
मुंबई, 25 जानेवारी 2017/AV News Bureau:
राज्यात समविचारी पक्षांशी आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सकारात्मक असून त्या दृष्टीने अनेक जिल्ह्यात काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी भवन येथे पक्षाच्या राज्य पार्लमेंट्री बोर्डची बैठक आज पार पडली, या बैठकीत आगामी महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांबाबत चर्चा झाली. या दरम्यान बारामतीचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे व त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. या बैठकी विषयी माहिती देताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले राज्यातील २५ जिल्ह्यात काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच पुणे, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, ठाणे, अकोला आणि अन्य महापालिकांमध्ये आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. २७ व २८ तारखे पर्यंत आघाडी बाबत निर्णय घेण्याच्या सुचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
राज्यात कुठेही छुपी आघाडी केली जाणार नाही, कुणी कार्यकर्ता पक्षाचा एबी फॉर्म घेऊन स्थानिक पातळीवर शिवसेना –भाजपा सोबत आघाडी करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा तटकरे यांनी दिला. तसेच काँग्रसेनेही याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी अपेक्षाही तटकरे यांनी व्यक्त केली.
भाजपच्या अनिल पाटील यांचा आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
भारतीय जनता पार्टीचे नेते व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनिल पाटील यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासमवेत अमळनेरच्या माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, अमळनेर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, अमळनेर खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष विजय पाटील, पचायंती समिती सदस्य जयश्री पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमाकांत पाटील, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष रायकरण पाटील, एल.टी.पाटील, अमळनेर पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाष देसले यांच्या सहित विविध गावचे सरपंच, सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांचे मुंबई येथे पक्षात स्वागत केले.