नवी मुंबई, 24 जानेवारी 2017/AVIRAT VAATHCAL NEWS:
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या 3 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणूकीच्या मतदानासाठी मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या 4 जानेवारी 2017 रोजीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी 3 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 23 जून 2011 च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र विधानपरिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित मतदार संघाच्या निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे.
सदरची रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे, असे शिवाजी कादबाने, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, कोकण विभाग शिक्षक मतदार संघ तथा उपायुक्त (सामान्य), कोकण विभाग यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.