भाजपमध्ये इतर पक्षांतील नाराजांचे इनकमिंग सुरु

दोन माजी आमदार, तीन विद्यमान नगरसेवक आणि एक माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल

मुंबई, २३ जानेवारी 2017:

माजी आमदार मंगेश सांगळे, माजी आमदार कृष्णा हेगडे यांच्यासह सेना नगरसेविका लिना शुक्ला,  मनसेचे नगसेवक भालचंद्र आंबोरे, नगसेवक परविंदसिंग भामरा, शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश नाईक आणि ख्यातनाम अभिनेते दिलीप ताहील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  मुंबई भाजप अध्‍यक्ष आमदार  आशिष शेलार यांनी आज सर्वांचे पक्षात स्वागत केले.

मनसेचे विक्रोळी विभागातील माजी आमदार मंगेश सांगळे यांनी भाजपात प्रवेश केला. मंगेश सांगळे हे विक्रोळी कन्नमवार परिसरातून सुरूवातीला नगरसेवक त्यानंतर आमदार म्हणून निवडून आले होते.  काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनीही पक्ष प्रवेश केला. दिवंगत शिवसेना नेते डॉ. रमेश प्रभू यांचे ते जावई असून विलेपार्ले विधानसभा मतदार संघातून ते आमदार म्हणून निवडून आले होते.

याशिवाय शिवसेनेच्या चांदिवली येथील विद्यमान नगरसेविका लिना शुक्ला, मनसेचे जोगेश्वरी येथील नगरसेवक भालचंद्र आंबोरे आणि मालाड येथील काँग्रेस नगरसेवक परविंदसिंग भामरा यांनीही भाजपात प्रवेश केला. याशिवाय शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि तत्कालीन आरोग्य समितीचे अध्यक्ष रमेश नाईक हिंदी सिने अभिनेते दिलीप ताहील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी आमदार प्रविण दरेकर, महापालिका गटनेते मनोज कोटक, भाजपा मुंबई उपाध्यक्ष भालचंद्र शिरसाट, नगरसेवक विनोद शेलार,  प्रवक्ते अतुल शाह आदी उपस्थित होते.