नवी दिल्ली, 19 जानेवारी 2017:
दिल्लीचे पोलीस आयुक्त आलोककुमार वर्मा यांची सीबीआयच्या (केंद्रिय अन्वेषण विभाग) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वर्मा हे पुढील दोन वर्षे सीबीआय संचालक म्हणून काम पाहतील. केंद्र सरकारने गुरुवारी वर्मा यांच्या नावाची घोषणा केली.
सीबीआयचे संचालक अनिल सिन्हा हे दोन डिसेंबर 2016 मध्ये निवृत्त झाले होते. त्यामुळे सीबीआय संचालकांचे पद रिक्त होते. राकेश अस्थाना यांच्याकडे हंगामी कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यामुळे सीबीआय संचालकपदासाठी आलोककुमार वर्मा यांच्यासह इंडो तिबेटियन सीमा पोलीस दलाचे महासंचलाक कृष्णा चौधरी, महाराष्ट्र पोलीस महासंचालक सतीश माथूर आदींची नावे शर्यतीत होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या समितीने वर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या समितीमध्ये सरन्यायाधिश जगदीशसिंग खेहर, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा समावेश होता.
आलोककुमार वर्मा (59) हे मूळचे दिल्लीचे आहेत. वर्मा हे 1979 च्या आयपीएस तुकडीचे अधिकारी आहेत. गेल्या वर्षी त्यांची दिल्ली पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्यापूर्वी ते तिहार कारागृहाचे महासंचालक होते. याशिवाय अंदमान, निकोबार, पुद्दुचेरी, मिझोरम आदी ठिकाणीही त्यांनी काम केले आहे.