ठाणे महापालिका आयुक्तांचे राजकीय पक्षांना आवाहन
ठाणे, 19 जानेवारी 2017 AV News Bureau :
ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरळीतपणे पार पडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्तांनी सर्व राजकीय पक्षांना केले आहे.
ठाणे महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांची बैठक घेवून आगामी निवडणुकीविषयी चर्चा केली. यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त मकरंद रानडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त(१) सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त(२) अशोककुमार रणखांब, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, महापालिकेचे आणि पोलिस विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस शहरातील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती सर्वांना देण्यात आली. यामध्ये नामनिर्देशन पत्र सादर करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, नमुना अ आणि नमुना ब कधी सादर करावे लागणार, मालमत्ता शपथपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र कधीपर्यंत सादर करू शकतो, निवडणूक खर्चाचे विवरण कधी सादर करावे लागणार यापासून ते आचारसंहितेमध्ये काय करावे आणि काय करू नये याबाबतची तपशीलवार माहिती सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांना देण्यात आली.
आयोगाने नामनिर्देशन ऑनलाइनपद्धतीने करण्याबाबत बंधनकारक केल्याचे सांगून नंतर त्याची प्रत शपथपत्रासह निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करावी लागणार आहे. ऑनलाइन पद्धतीने नामनिर्देशन कसे भरावे याचे प्रशिक्षण ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाकडून देण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
दरम्यान, या निवडणुकीसाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली असून प्रत्येक प्रभागनिहाय निवडणुकीसाठी उमेदवारांना लागणा-या कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.