पनवेल, 18 जानेवारी 2017 /AV News Bureau :
पनवेलमध्ये येत्या 22 जानेवारी रोजी राज्यस्तरीय मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर मॅरेथॉन कमिटीच्या वतीने ही स्परर्धा आयोजित करण्यात येणार आहे. ‘रन टू प्रमोट कॅशलेस ट्रान्झक्शन’ ही या मॅरेथॉन स्पर्धेची संकल्पना आहे, ज्येष्ठ अभिनेत्री आणि भरतनाट्यम नर्तिका सुधा चंद्रन यांच्या हस्ते मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला जाणार असल्याची माहिती रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे व्यवस्थापकीय संचालक परेश ठाकूर यांनी सोमवारी मुंबई येथे पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस प्रसिद्ध मॉडेल व रियालिटी शो बिग बॉस स्पर्धक आर्यन वैद, फिटनेस मॉडेल रॊमल शर्मा, अभिनेता सिकंदर खान आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
मॅरेथॉनची पूर्वतयारी म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लिटल वर्ल्ड खारघर, ओरिअन मॉंल पनवेल अशा काही ठिकाणी फ्लॅश डान्सचे आयोजन करण्यात आले होते. १५ महत्त्वाच्या हाऊसिंग सोसायट्यांमध्ये फिटनेस आणि ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे खारघर हिलवर झालेल्या एक किमी प्री मॅरेथॉन वॊकेथोनमध्ये ३०० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला.
या उपक्रमाचा प्रसार करण्यासाठी तीन विभागांत वक्तृत्त्व आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती: शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सामान्य जनता. ‘भारताचा कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या दिशेने प्रवास’ या संदर्भात जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता. यामध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे यासाठी एकूण दोन लाखांची बक्षिसे ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत २००० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.