अखिलेशच्या हातात ‘सायकल’

नवी दिल्ली, 16 जानेवारी 2017 :

समाजवादी पक्ष आणि पक्षाचे चिन्ह आता अखिलेश यादव यांच्यात हातात राहणार आहे. पक्ष आणि सायकल चिन्हावरून पिता पुत्रामध्ये सुरू असलेल्या वादात निवडणूक आयोगाने अखिलेश यादव यांच्याबाजूने निर्णय देत मुलायम सिंह यादव यांना मोठा दणका दिला आहे.

उत्तर प्रदेशच्या राजकारणात समाजवादी पक्षातील पिता पुत्राचा वाद चांगलाच रंगला आहे. समाजवादी पक्ष आणि त्या पक्षाचे चिन्हावर कोणाचा हक्क यावरून पिता पुत्रामध्ये लढाई सुरू होती. हा वाद निडवणूक आयोगाकडे गेला होता. मुख्य निवडणूक आयुक्त नसिम झैदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीने दोन्ही बाजूंचे म्हणणे 13 जानेवारी रोजी ऐकून घेतले होते. त्यानंतर या समितीने अखिलेश यादव यांच्या बाजूने कौल दिला. यामुळे समाजवादी पक्ष आणि सायकल चिन्ह अखिलेश यादव यांच्याकडे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आगामी निवडणुकीत अखिलेश यादव यांच्या समर्थकांना तिकिट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या अखिलेश यादव यांनी आपल्या उमेदवारांची स्वतंत्र यादीच जाहीर केली होती. तसेच 212 आमदारांचा पाठिंबाही आपल्याला असल्याचे सांगत पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा केला होता. त्यामुळे मुलायमसिंह यादव यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती.