महापालिका मुख्यालयासह इतर कार्यालयातील अधिकाऱ्यांना 3 ते 5 या वेळेत नागरिक भेटू शकणार
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 9 एप्रिल 2025
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिक विविध कामांकरिता नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील विविध कार्यालयांमध्ये येत असतात तसेच इतर विभागांतील कार्यालयांनाही भेटी देत असतात. या नागरिकांच्या सूचना, विनंती, तक्रारी समजून घेणे, त्यांच्या अडीअडचणी दूर करणे, शासनाच्या विविध योजना इत्यांदींची माहिती नागरिकांना देणे इत्यादी कामे स्थानिक कार्यालयातील अधिकारी यांचेमार्फत होत असतात. ही बाब लक्षात घेवून नागरिकांना आपल्या विविध कामांसाठी अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी दुपारी 3 ते 5 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे.
आपल्या कार्यक्षेत्रातील कामाचा आढावा घेणे, त्यांचे पर्यवेक्षण करणे, त्यावर देखरेख ठेवणे इ. जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी अधिकारी यांस कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी द्याव्या लागत असल्याने कार्यालयात विविध कामांसाठी भेटीस येणा-या नागरिकांना भेट देऊन त्यांचे म्हणणे जाणून घेणे व त्यांच्या तक्रारींची दखल घेणे व त्यांचे समाधान करणे तितकेच आवश्यक आहे.
हे वाचा : प्राणी प्रेम आणि स्वच्छता
या संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या दि. 27 मे 2013 रोजीच्या परिपत्रकानुसार, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील अधिकारी यांनी त्यांच्याकडे भेटीसाठी येणाऱ्या अभ्यागतांसाठी भेटण्याची वेळ दुपारी 3 ते 5 निर्धारित करण्यात येत असल्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी विशेष परिपत्रकाव्दारे निर्देशित केले आहे. आहे. याकरिता अधिकारी यांनी आठवड्यातील दिवस निश्चित करावेत व या कालावधीमध्ये शक्यतो विभागांतर्गत बैठकांचे आयोजन करण्यात येऊ नये असेही सूचित करण्यात आलेले आहे.
क्षेत्रीय पातळीवरील प्रत्येक कार्यालयातील अधिकाऱ्यांनीही नागरिकांच्या भेटीसाठी निश्चित वेळ राखून ठेवावा व तो वेळ शक्यतो दुपारनंतर ठेवण्यात यावा. तसेच या राखीव वेळात शक्यतो बैठकांचे आयोजन करण्यात येऊ नये असे सूचित करण्यात आले आहे. कर्तव्याचा भाग म्हणून करावयाचे दौरे वा भेटी यासाठी आठवड्यातील ठराविक दिवस निश्चित करावेत व त्याची माहिती कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात यावी, जेणेकरुन नागरिकांना सुविधाजनक ठरेल असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
हे वाचा : इमारतींची पडझड आणि उदासिनता
कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने महानगरपालिका मुख्यालयात येणा-या अभ्यागतांकरिता मुख्य प्रवेशद्वार क्र.1 येथून दुपारी 2 नंतर प्रवेश देण्यात येणार असून सुरक्षा विभागामार्फत अभ्यागतांच्या प्रवेशाकरिता संवंधित विभागप्रमुख यांच्या सूचनेनुसार प्रवेशिका देण्यात येईल.
नागरिकांचा वेळ महत्वाचा असून त्यांच्या श्रम, मूल्य व वेळेत बचत व्हावी आणि कामकाजात सुनियोजितता यावी यादृष्टीने अभ्यागत भेटीची वेळ व प्रक्रिया महत्वाची असून महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे.
————————————————————————————————-