स्वामी विवेकानंदांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन व्यक्तिमत्व घडवा

प्रा.प्रवीण दवणे यांचे युवा पिढीला आवाहन

  •  अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 13 जानेवारी 2025

प्रत्येक माणसात स्वत:चे असे काहीतरी वेगळेपण आहे. ते ओळखा आणि आपले ध्येय निश्चित करुन त्या दिशेने वाटचाल करा. इच्छेची गुरुकिल्ली असेल तरच प्रगतीचा दरवाजा उघडतो त्यामुळे एकाग्रता आणि समग्रता ठेवून योग्य त्याची निवड करा आणि उत्साहाने जगा व आत्मभान राखून जगा अशा शब्दात प्रा.प्रवीण दवणे यांनी नवी मुंबईतील युवा पिढीशी ह्रदयसंवाद साधत स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील विविध प्रसंग, त्यांनी वेळोवेळी मांडलेले विचार उदाहरणांसह गुंफत विदयार्थ्यांची मनोभूमिका तयार केली.

नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनाचे अर्थात ‘राष्ट्रीय युवक दिना’चे औचित्य साधून विष्णुदास भावे नाटयगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘युवकांचे विवेकानंद’ अर्थात ‘तेजातून तेजाकडे’ हे व्याख्यानपुष्प गुंफत प्रा.प्रवीण दवणे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रातून तरूणाईच्या विचारांना दिशा दिली.

याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, परिमंडळ 1 उपआयुक्त सोमनाथ पोटरे, शिक्षणाधिकारी अरुणा यादव तसेच शाळा – महाविदयालयांचे प्राचार्य व शिक्षक आणि विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

इथे क्लिक करा :  शिक्षणाचे वास्तव

केवळ 39 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या स्वामी विवेकानंद यांची जयंती आपण आज 162 वर्षानंतरही साजरी करीत आहोत व यापुढेही अनेक वर्ष ती साजरी होत राहील कारण त्यांचे संपूर्ण जीवनचरित्रच नवी ऊर्जा व प्रेरणा देणारे आहे असे सांगत प्रा.प्रवीण दवणे यांनी युवकांवर त्यांचे विलक्षण प्रेम होते, कारण भविष्य घडविण्याची ताकद युवा पिढीमध्येच आहे हा त्यांचा ठाम विश्वास होता अशा शब्दात त्यांची महती सांगितली. त्यामुळे विवेकानंदानी म्हटल्याप्रमाणे वेळेचे व्यवस्थापन योग्य रितीने स्वत:च्या विकासासाठी करा. आभासी जगात जगू नका. जागरुक राहून व्यक्तीमत्व घडवा. त्यासाठी कामात बुध्दीनिष्ठता ठेवणारा मेंदू, त्यासाठी आवश्यक कृती करणारे हात तसेच संवदेनशील ह्रदय जागे ठेवा ही व्यक्तीमत्व घडविण्याची त्रिसूत्री असल्याचे ते म्हणाल. रिल्स बघून बघून आपल्या वेळेसोबत आपले आयुष्य गुंडाळले जाते आहे याचे भान राखून ‘आयुष्य न मागे वळते रे’ हे ध्यानात घ्या व प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करा ही विवेकानंदांना खरी आदरांजली आहे असे प्रा. प्रवीण दवणे म्हणाले.

इथे क्लिक करा :  इमारतींची पडझड आणि उदासिनता

जिद्द पेरा, यशाचे पीक येईल आणि आळस पेरला तर दारिद्रय येईल हे समजून घेण्याची हीच वेळ आहे, कारण तुमच्या जीवन वाटचालीची सुरूवात होत आहे, त्यामुळे म्हातारपणात पस्तावण्यापेक्षा काहीतरी बनण्यासाठी जागरुक होऊन ध्येय निश्चित करा व त्या दिशेने वाटचाल करा, त्यासाठी हवी तेवढी मेहनत घ्या असे विदयार्थ्यांना सांगत प्रा.प्रवीण दवणे यांनी शिक्षकांनीही, मग तो कोणत्याही विषयाचा असो, विदयार्थ्यांची अभिरूची घडवावी व अपेक्षित नव्हे तर अनपेक्षित प्रश्न सोडविण्याची तयारी त्यांच्याकडून करून घ्यावी असे मत व्यक्त केले. नागरिकशास्त्र हा आपल्या शिक्षणक्रमातील सर्वाधिक महत्वाचा विषय असून नवी मुंबई महानगरपालिका त्यादृष्टीने अशा प्रकारच्या नानाविध उपक्रमांतून संस्कृती जपतानाच माणूसपण बांधण्याचे फार मोठे काम करीत आहे अशा शब्दात त्यांनी गौरव केला.

याप्रसंगी बोलताना महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी थोर तत्वज्ज्ञ व समाजसुधारक असलेले विश्वव्यापी व्यक्तिमत्व स्वामी विवेकानंदांच्या जीवनचरित्रातून तरुणांनी प्रेरणा घ्यावी यादृष्टीने प्रा.प्रवीण दवणे यांच्या प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. जगातील सर्वात तरुण देश असणाऱ्या आपल्या देशातील युवावर्गाकडून फार मोठया अपेक्षा असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. आज माहितीच्या मायाजालात वावरत असताना आपली माहिती ज्ञानात परिवर्तीत होण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत असे ते म्हणाले. सोशल मिडीया कितीही आवडीचा असला तरी त्याचा आपल्या प्रगतीत त्याचा अडथळा होणार नाही याची काळजी घेण्यास सांगत आयुक्तांनी वर्तमानातील हवामान बदलासारख्या समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा व आपले योगदान दयावे अशी भूमिका मांडली. आयुष्य बरबाद करणाऱ्या व्यसनांपासून जागरुकतेने दूर राहून आपल्या चुकीच्या वाटेने जात असलेल्या मित्रमैत्रिणींनाही त्यापासून परावृत्त करावे असे त्यांनी सांगितले. त्यासोबतच आपल्या परीने सामाजिक बांधिलकी जपत युवक-युवतींनी विविध सेवाभावी उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

========================================================


========================================================