- स्वप्ना हरळकर/अविरत वाटचाल
- नवी मुंबई, 15 डिसेंबर 2024
काही दिवसांपूर्वी समाजमाध्यांवर एक पोस्ट पाहण्यात आली होती. त्यामध्ये दोन वयोवृद्ध महिला हातात फलक घेवून निषेध नोंदवताना दिसत होत्या. त्यामध्ये घरातल्या कुत्र्यांना, पाळीव प्राण्यांना घरातच मलमूत्र विसर्जन करायला लावा असा संदेश लिहिला होता. हा व्हिडिओ अगदी काही काळासाठी नजरेसमोरून गेला पण त्यानंतर विचारांचे चक्र सुरू झाले. पाळीव प्राण्यांना रस्त्यावर मलमूत्र विसर्जन करायला घेवून येणारे प्राणी प्रेमी यानिमित्ताने डोळ्यासमोरून गेले.
अगदी अचानक आलेला हा विषय नक्कीच नाही. कारण समाजमाध्यांवर टाकताना खूप विचार करून पोस्ट केलेला विषय आहे. पाळीव प्राणी हा ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय आहे. काही जणांसाठी ते घरातले एक सदस्यच असतात. अगदी त्यांच्या जेवणापासून ते त्यांना ग्रुमिंग करण्यापर्यंत त्यांचे लाड पुरवले जातात. मात्र त्यांना नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर रस्त्यावर आणले जाते. मग ते गाडीच्या चाकांवर, रस्त्याच्या मधोमध, कडेला कुठेही मलमूत्र विसर्जन करतात. त्यांना निसर्गाने जे ज्ञान दिलं आहे त्यानुसार ते वागतात. मात्र त्यांचा सांभाळ करणारे त्यांचे आई वडील (कुत्र्यांचे मालक- पालक) मात्र रस्ता घाण करण्यात मोलाचा हातभार लावतात. मग पुढे ही विष्ठा कधी मानवी पायांनी, कधी गाड्यांच्या चाकांनी तर कधी इतर प्राण्यांमुळे इतस्ततः पसरली जाते. त्यामुळे रस्त्यावर विशेषतः फूटपाथवर चालणे मुश्किल झाले आहे.
काही वर्षांपूर्वी मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह परिसरात कुत्र्यांना फिरवायला आणण्यासाठी बंदी घालण्यात आली. कुत्र्यांना फिरवायच्या नादात त्याने केलेल्या घाणीकडे हे लोक कानाडोळा करतात. त्यामुळे यावर तोडगा म्हणून पालिकेने त्या कुत्र्याच्या मालकाकडून 500 रुपयांचा दंड वसूल करायचा निर्णय आहे. जॉगिंगसाठी किंवा फेरफटका मारण्यासाठी येणारे काही नागरिक आपल्यासोबत कुत्र्यांनाही घेऊन येतात. या कुत्र्यांनी ठिकठिकाणी केलेल्या घाणीकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जाते. तेव्हा मरिन ड्राईव्हची स्वच्छता कायम राहावी आणि स्वच्छतेचे महत्त्व सर्वांनाच पटावे यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला.
इथे क्लिक करा: सायबर साक्षरतेची गरज
असाच एक निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेनेही घेतला. पाळीव प्राण्यांना मलमूत्र विसर्जन करता यावं यासाठी काही भागांमध्ये पेट कॉर्नर तयार करण्यात आले आहेत. मात्र त्यांचा वापर फारसा झालेला दिसत नाही. कुत्र्यांच्या मालकांनी आपल्या लाडक्या कुत्र्यांना या ठिकाणी नेवून त्याचं मलमूत्र विसर्जन तिथे करून घेणं अपेक्षित होतं. पण हा प्रयोग फारसा यशस्वी होताना दिसत नाही. याचं कारण कदाचित या मालिकांमध्ये पुरेशी जनजागृती केली न गेल्याचही कारण असू शकेल. कुत्र्यांनी मल विसर्जन केल्यानंतर मालकांनी ते जमा करून विशिष्ट ठिकाणी टाकण्याचे शिक्षण मालकांना देण्याची गरज आहे. त्यानंतर ते पुढे कच-यात जमा करण्याचे काम सफाई कामगारांना करावं लागतं. म्हणजे मानवी मैला हाताळण्यासाठी कायद्याने बंदी असताना पाळीव प्राण्यांचा मैला हाताळण्याची मात्र जबाबदारी सफाई कामगारांवर पर्यायाने आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने घेतलेला हा निर्णय नक्कीच धक्कादायक होतात. कारण एकप्रकारे मानवी हस्तक्षेपाने मैला वाहून नेण्याचीच ही एक पद्धती आहे. सुदैवाने हे पेट कॉर्नर पाळीव प्राणी मालकांकडून उपयोगात आणले न गेल्याने हा प्रश्न निर्माण झाला नसावा. मात्र तरिही प्रश्न मलमूत्र कोणी हाताळावं हा शिल्लक राहतोच. त्यामुळे ज्यांची बाळं (कुत्री) त्यांनीच त्यांचे मलमूत्र हाताळायला हवं.
पाळीव प्राणी त्यातही कुत्रे, मांजर घरी पाळण्याचे वेड आजकाल खूप जास्त प्रमाणात पसरले आहे. अर्थात ही ज्याची त्याची इच्छा आणि आवड आहे. ग्रामीण भागात जिथे मोठ्या प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध असते तिथे यामुळे फारसा कोणालाही फरक पडत नाही. मात्र शहरांसारख्या ठिकाणी मात्र फरक पडतो. त्यामुळे आपली हौस पुरवताना इतर कोणालाही त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणं गरजेचं नाही तर अत्यावश्यक आहे. प्राणी हे पूर्वीपासून माणसाच्या सोबत आहेत. पण हा प्रश्न कधी एवढा गंभीर बनला नव्हता. यापुढेही हा प्रश्न अधिक गंभीर होणार आहे त्यामुळे प्रत्येक विभागातील संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन कठोर नियम आणि कारवाई करणं अपेक्षित आहे.
========================================================
========================================================