- स्वप्ना हरळकर /अविरत वाटचाल
- नवी मुंबई, 14 डिसेंबर 2024
आजचं युग हे इंटरनेटचं आहे. जगाच्या पाठीवर कोणत्याही कोप-यात बसून तुम्ही एकमेकांशी संपर्कात राहू शकता ही किमया साधली आहे ती केवळ यामुळेच. जसा इंटरनेटचा वापर वाढत गेला तसा त्याचे फायदे आ़णि तोटे समोर येत गेले. आज लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आहे. त्यामुळे जगाशी, जगात घडणाऱ्या प्रत्येक घटना लोकांना काही वेळातच समजतात. जसं इंटरनेट मुळे जग जोडलं गेलं तसंच इंटरनेट मुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण देखील वाढत जावू लागले आहे. हातातल्या मोबाईलवरून
ऑनलाईन पेमेंट सुरू झालं आणि ऑनलाइन फसवणूक हा नवीन प्रकार सुरू झाला. खर तर ऑनलाईन पेमेंट हे खूप सोपे आणि फायदेशीर मानले जाते. पण लोकांना आर्थिकदृष्ट्या फसवण्यासाठी सायबर चोराकडून याचा वापर केला जातो. बॅंका, पोलिस, सायबर तज्ञ याबाबत सातत्याने सांगत आहेत की अधिकृत असल्याशिवाय कोणालाही ओटीपोट नंबर देऊ नका. मात्र दुर्दैवाने आजही अशा फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. सायबर फसवणूकीत कोणाचा चेहरा दिसत नाही पण त्याचा उद्देश आपल्याला घाबरवून आर्थिक फायदा करून घेणे किंवा डिजीटल अरेस्ट सारखी भिती दाखवून लोक काय म्हणतील या तुमच्या कमकुवत विचाराचा फायदा घेणं हाच असतो. कोणतीही नोटीस आलीच तर पोलिसांशी संपर्क साधून शहानिशा करून घ्यायला हवी. त्यामुळे एखादा फोन आलाच तर पहिल्यांदा शांत होवून संबंधित व्यक्तिला संपर्क साधा आणि पोलिसांची मदत घ्या. ऑनलाइन फसवणूक किंवा सायबर फसवणूक झाली असल्यास 1930 या क्रमांकावर संपर्क साधून आपली तक्रार दाखल करा. तिथले तज्ज्ञ तुम्हाला मार्गदर्शन करतील. तसंच सायबर गुन्ह्यांवर त्वरित कारवाईसाठी 14407 हा हेल्पलाईन क्रमांकदेखील राज्य सरकारने सुरू केला आहे.
पूर्वी आपण कामासाठी ई मेलचा वापर करत होतो. पण आता त्याची जागा व्हॉट्सॲपने घेतली आहे. वेगवेगळ्या संस्थांचे वेगवेगळे ग्रुप तिथे असतात. त्यामुळे अपडेट देण्याचा निमित्ताने जवळपास दिवसभर आपण व्हॉट्सॲपवर कार्यरत असतो. ऑनलाइन दिसत असतो. सध्या 35 पेक्षा जास्त चॅटिंग प्लॅटफॉर्म आहेत. त्यामुळे नकळतपणे दिवसातून एकदा तरी एखाद्या चॅटिंग प्लॅटफॉर्मचा वापर आपल्याकडून होत असतो.
कोणत्याही सामाजिक माध्यमावर जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला आवडलेली रिल, व्हिडीओ, फोटो आपण सतत पाहतो. एखादी वस्तू घ्यायची असेल तर आपण पहिलं नेटवर सर्च करतो त्याच्याबद्दल अधिक माहिती करून घेतो. संबंधित विषयावर रिसर्च करतो आणि नंतर तुमच्या प्रत्येक पेज वर त्याच्याशी संबंधित जाहिराती दिसू लागतात. या जाहिराती मधून तुम्हाला हवा असलेला प्रोडक्ट्स समोर येतो आणि तुम्हाला त्याच्याबद्दल ऑफर दिसू लागतात. कारण तुमचा डेटा गोळा केला जातो. तुम्हाला काय आवडत आहे, तुमची आवड कशात आहे याबद्दल माहिती गोळा केली जाते. त्याचा वापर करून सायबर गुन्हेगार तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर देण्यासाठी सातत्याने तुमच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करत असतात. एखाद्या वेळी तुम्ही या ऑफर्सला बळी पडता आणि संपूर्ण बॅंक खातं रिकामी होते.
साधारणपणे 15 ते 24 या वयोगटातील मुलांची साधारण आवड लक्षात घेऊन त्यांना लक्ष केलं जातं. ही मुलं बहुतेक वेळा गेमिंग प्लॅटफॉर्मवर सक्रिय असतात, मग त्यातून त्यांना काय आवडतं आहे त्यांना कोणत्या गेम मध्ये आवड आहे त्याचे रिल्स त्याची लिंक त्यांना शेअर केली जाते आणि त्यातून त्यांची मानसिक परिस्थिती, त्यांची कौटुंबिक परिस्थिती याचा अभ्यास केला जातो.
यामधून या मुलांना काही गोष्टी करण्यासाठी सांगितलं जातं. आणि मुलं त्याला बळी कशी पडतील हे पाहिलं जातं. या मुलांकडे असलेल्या अॅक्सेस मधून संबंधित सर्वांचेच अकाऊंट चेक केले जातात. त्यामधील पासवर्ड, महत्वाची माहिती गोळा केली जाते. नकळतपणे सायबर गुन्हेगार तुमच्यावर लक्ष ठेवून राहतात. काही गोष्टी आपण बदलू शकत नाही मात्र काही काळजी घेतली तर आपली फसवणूक मात्र टाळू शकतो. सर्वात महत्त्वाचा म्हणजे पासवर्ड. तुमचा पासवर्ड, बॅंकेचे डिटेल्स याची माहिती शेअर करू नका. विविध सामाजिक माध्यमांवर तुमचे फोटो शेअर करत असाल तर तिथे कुठे आहात, कुठे जाताय याची माहिती देवू नका.
हातातल्या फोनमुळे, इंटरनेटमुळे टेक्नोसॅव्ही झालो आहोत मात्र आता सायबर साक्षर होण्याची आवश्यकता आहे हे मात्र नक्की.