- स्वप्ना हरळकर/ अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
केंद्र सरकारने 3 ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेसोबतच बंगाली, आसामी, पाली, प्राकृत भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर अनेक स्तरांतून, मान्यवरांकडून, भाषेच्या अभ्यासकांकडून याबाबत आनंद व्यक्त करण्यात आला. त्यानिमित्ताने अभिजात भाषा म्हणजे काय, ती कशी ठरवली जाते, त्यासाठी कोणते निकष लावले जातात याचीही चर्चा सुरू झाली.
आतापर्यंत कदाचित मराठीच्या अभ्यासकांना माहित असलेले अनेक संदर्भ, भाषेचे ऐतिहासिक महत्व याची माहिती तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाला माहित झाली. मराठी भाषेचा जो शिलालेख ज्यावरून मराठी प्राचीन असण्याचा पुरावा मानला गेला आहे तो शिलालेख आता अनेकांना निदान मराठी मातृभाषा असलेल्या आणि नसलेल्या प्रत्येकाला माहित होईल. कदाचित काही चिकित्सक, अभ्यासक आणि पर्यटक हा शिलालेख बघण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचतील.
हे दोखील वाचा : समृध्दीला पर्यटनाची जोड
इतिहासाचा मागोवा घेवून त्यावेळचं महत्व आ़णि पर्यायाने तो काळ, संदर्भ पुढच्या पिढीला माहीत होईल. इतिहासातून शिकता येतं म्हणतात त्याची प्रचिती यामुळे नक्कीच येईल. हा शिलालेख पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातल्या नाणेघाटातील एका लेण्यांच्या दगडी भिंतींवर सातवाहन काळात कोरलेला आहे.
त्याचं जतन केलं गेलं आणि मराठीच्या प्राचीन असण्यावर शिक्कामोर्तबच झाल़ं. खरंतर प्रत्येक मैलावर भाषा बदलते असं म्हणतात. महाराष्ट्राची भाषा मराठी असली तरी प्रत्येक भागात बोलली जाणारी बोली भाषा वेगळी आहे. आता या बोली भाषांचं संवर्धन करणं शक्य होणार आहे. बोली भाषा एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे कोणत्याही दस्तऐवजा़शिवाय हस्तांतरित होत असतात. आता मात्र त्यांचं कागदोपत्री नोंद करणं शक्य होईल हा आनंद वेगळा आहे.
हे देखील वाचा : ठाण्यात वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्प
मराठी बोलणारे कितीही शुध्द मराठीत एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा एखादा शब्द, एखादं वाक्य हे त्या बोलीप्रमाणे त्यांच्याकडून सहजच उच्चारलं जातं. त्यावेळी ऐकणा-याला भाषेचा लहेजा सहजच समजून येतो आणि तो सहज त्या बोलीचा विचार करू लागतो. हे घरातूनच मिळालेलं असतं आणि तेच भाषेला पुढे नेतं. त्यामुळेच तर बोली भाषा आजही टिकून आहेत. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी भाषा हे माध्यम आहे असं मानलं तरी एखादी भाषा ही जागतिक पातळीवर संवादाची भाषा बनते. मराठी ही भाषा तशीच व्हावी अशीच इच्छा आहे.
आज आपल्याकडे ज्याप्रमाणे चायनीज, रशियन, जॅपनीज, फ्रेंच या परदेशी भाषा शिकवल्या जातात तशीच जेव्हा मराठी भाषा परदेशातले विद्यार्थी शिकतील तेव्हा मराठी ख-या अर्थाने ग्लोबल होईल. जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी बोलणारे लोक मोठ्या संख्येने राहतात त्यांच्यापैकी अनेक जण घरात आवर्जून मराठीतच एकमेकांशी बोलतात. जगाच्या पाठीवर कुठेही जा पण आपल्या मातृभाषेत जो संवाद संवाद इतरांशी नव्हे तर स्वतःशी साधता येतो त्याला तोड नाही.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आता भाषेच्या संवर्धनासाठी काम करता येणं शक्य होणार आहे. अर्थातच काही व्यक्ती, संस्था त्यासाठी आधीही काम करत होतेच आता त्या कामाला आणखीन जोड मिळेल.
मराठी भाषेतलं प्राचीन साहित्य आजचा काळात जपायचं झालं तर त्यासाठी आधुनिकतेची जोड द्यावी लागेल. त्यानिमित्ताने या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. कदाचित नवीन तंत्रज्ञान त्यासाठी विकसीत केलं जाईल. मराठीमध्ये विपुल प्रमाणात साहित्य आहे, प्रत्येक साहित्य येणाऱ्या पिढीसाठी नवीन पध्दतीने खुलं होईल. स्वतः चं वेगळेपण असलेली ही भाषा आपली मातृभाषा असल्याचा अभिमान असणाऱ्या प्रत्येकाला याचं समाधान नक्कीच असणार आहे. एकीकडे केवळ सरकार दरबारी अस्तित्वात राहिलेली प्रमाण मराठी आणि बोली मराठी यांमधील दुरावा संपून भाषेचं सौंदर्य जपलं जातंय हे सुध्दा एक सुखचं आहे.
========================================================
========================================================