कोकणी माणसाची शिवसेनेत घुसमट

 आमदार नितेश राणे यांचा आरोप

कोकणवासियांचा दुसरा मेळावा उद्या कांदिवलीत

मुंबई, 14 जानेवारी 2017/AV News Bureau :

मुंबईतील कोकणी माणूस हा शिवसेनेचा मतदार मानला जातो. मात्र सध्या शिवसेना नेतृत्वाची भाजपसमोरची हतबलता पाहून हा कोकणी माणूस अस्वस्थ आहे. स्वाभिमान हा कोकणी माणसाच्या अनेक गुणांपैकी एक गुण आहे. त्यामुळे अशा स्वाभिमानी कोकणी माणसाची सध्या शिवसेनेत घुसमट होत असल्याचा आरोप कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

 कोकणी माणसाच्या सर्वंकष विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे. प्रत्येक कोकणी माणसाला काँग्रेसशी जोडून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. कोकणातून मुंबईत नोकरीच्या शोधात येणाऱ्या युवकांसाठी नोकरी महोत्सव, कोकणी पदार्थांसाठी मुंबईत स्टॉल उपलब्ध करून देणे, घरगुती उत्पादनांसाठी मुंबईच्या शॉपिंग मॉलमध्ये जागा उपलब्ध करून देणे, अशी अनेक उद्दिष्टे नजरेसमोर आहेत. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील सहा विधानसभा मतदारसंघात मुळचे कोकणी आणि सध्या मुंबईत वास्तव्यास असलेल्या कोकणवासियांचे छोटे मेळावे, सभा आणि बैठकांचे आयोजन करण्यावर भर दिला आहे. यापैकी पहिला मेळावा ८ जानेवारीला पार पडला आहे. तर १५ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता कांदिवली पूर्व, सेक्टर ७ येथील ज्ञानवर्धिनी शाळेच्या सभागृहात दुसऱ्या मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती राणे यांनी दिली.

 रविवारच्या मेळाव्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे,  नितेश राणे आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम हे मार्गदर्शन करणार आहेत.