शिंदे गटाचे संजय निरुपम, आ. संजय शिरसाट आणि भाजप नेते आशिष शेलार यांचे गंभीर आरोप
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 14 सप्टेंबर 2024
विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधातील बातम्या समोर येत आहेत. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह माजी खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय निरुपम आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंचे पीए रवी म्हात्रे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. म्हात्रे हे पैसे घेऊन पदे विकत असल्याचा आरोप संजय शिरसाट, निरुपम आणि शेलार यांनी केल्याने ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.
गेल्या पंधरा-वीस वर्षात ज्या – ज्या नेत्यांनी शिवसेना सोडली त्या सर्वांनीच शिवसेनेत खास करून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नजीकच्या लोकांकडून निवडणुकीत पैसे घेऊन तिकीट विकले जात असल्याचे आरोप केलेले आहेत. यात नारायण राणेंपासून तर राज ठाकरे या अनेक नेत्यांचा समावेश आहे. पैसे घेऊन विधानसभेचे किंवा महापालिकेचे तिकीट दिले जाते, असे आरोप करूनच राज ठाकरे देखील बाहेर पडले होते. या सर्व नेत्यांच्या रडारवर खासकरून उद्धव ठाकरे होते.
हे वाचा : राहुल गांधींची आरक्षण संपवणारी योजना अमेरिकेतून उघड: देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडलेले आणि विरोधकांना अंगावर घेत शिवसेनेचा किल्ला लढवत असलेले संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी अत्यंत गंभीर आरोप केला. त्यांनी थेटच रवी म्हात्रे आणि विनायक राऊत या दोघांचा नामोल्लेख केला. विनायक राऊत हे उद्धव सेनेचे सचिव आहेत तर रवी म्हात्रे हे उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आहेत. संजय शिरसाट यांनी आरोप केला की विनायक राऊत यांच्या मदतीने रवी म्हात्रे हे पैसे घेऊन पक्षातील लोकांना पदे विकत आहेत. ‘पैसे आणा आणि पदे घ्या’ ही कार्यपद्धती सध्या उद्धवसेनेत सुरू असल्याचा आरोप देखील संजय शिरसाट यांनी केला आहे.
हे वाचा : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची व्यवस्थापन समिती
शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनीही शिरसाट यांनी आरोपाला दुजोरा दिला आहे. निरुपम यांनी आरोप केला की, उबाठा पैसे घेऊन काँग्रेस आणि शरद पवारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.
तर भाजपचे आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनीही आ. शिरसाट आणि संजय निरुपम यांच्या दाव्याला समर्थन दिले. पैसे दो पैसे लो हीच कामे विनायक राऊत आणि रवी म्हात्रे करीत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनीही केला आहे.
हे वाचा : गणपती उत्सवासाठी अनारक्षित विशेष गाड्यांच्या १४ अतिरिक्त सेवा
शिरसाट यांच्या या आरोपाला अद्याप तरी उद्धव सेनेकडून कोणीही प्रत्युत्तर दिलेले नाही. यावरून उद्धवसेनेत सारे काही आलबेल नाही, हे दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरु झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत देखील विनायक राऊत यांनी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचे आरोप झाले होते. त्या आरोपांवर देखील उद्धव ठाकरेंकडून कुठलीही चौकशी करण्यात आली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
उद्धव सेनेच्या महिला पदाधिकारी देखील पैसे घेतात, असा थेटच आरोप संजय शिरसाट यांनी केला. त्यांनी नामोल्लेख केला नसला तरी त्यांचा इशारा उद्धवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्याकडे असल्याचे म्हटले जाते. अंधारे या पैसे घेऊन पदे देतात, असा आरोप बीडचे उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला होता. त्यावेळीही या आरोपांची चौकशी उद्धव सेनेकडून करण्यात आली नाही, याउलट जाधव यांना पक्षातून निलंबित करण्यात येऊन अंधारे यांचा बचाव करण्यात आल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.
========================================================
=======================================================