थंडीने हापूसचा मोहोर गळाला

मार्च महिन्यातील हापूसचे उत्पादन घटण्याची भिती

आंबा उत्पादकांची चिंता वाढली

 स्वप्ना हरळकर/AV News

नवी मुंबई, 14 जानेवारी 17

आपल्या अवीट चवीने साऱ्या जगाला वेड लावणारा हापूस यंदाच्या मोसमात संकटात सापडण्याची भिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या थंडीच्या लाटेने कोकणातील आंब्याचा मोहोर गळू लागला आहे. त्यामुळे मार्चमध्ये येणाऱ्या हापूसचे उत्पादन घटण्याची भिती आंबा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हापूसचे उत्पादन घटले तर त्याचा फटका आंबा उत्पादक शेतकरी, ग्राहक आणि निर्यातीलाही बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जानेवरी महिना सुरू झाला की, कोकणातील अवीट चवीच्या हापूसचे वेध लागतात. कोकणातील हापूस आंब्याच्या नैसर्गिक गोडीमुळे त्याला साता समुद्रापार प्रचंड मागणी असते. गेल्या काही वर्षांत हापूसकडे नगदी पिक म्हणूनही पाहीले जात आहे.  मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानामध्ये कमालीचा बदल झाला आहे. थंडीची लाट पसरल्यामुळे विविध भागांमधील तापमान घसरू लागले आहे. त्याचा कोकणातल्या हापूसच्या पिकावर होवू लागला आहे. थंडीमुळे हापसू आंब्याला आलेला मोहोर गळून पडू लागला आहे. त्यामुळे फळ निर्मितीमध्ये घट होवून हापूसचे उत्पादन कमी होण्याची भिती वाशी बाजारातील फळ मार्केटमधील व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.

हापूसचा खरा मोसम फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होतो. मार्चमध्ये हापूसचा बाजार तेजीत असतो. मात्र यावेळी जानेवारीत थंडीमुळे झाडावरील मोहोर गळून पडल्यामुळे मार्चमध्ये येणाऱ्या आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम हापूस आंब्याशी निगडीत अर्थव्यवस्थेवर आणि जोडधंद्यांवर होईल, अशी भिती जाणकारांनी वर्तविली आहे.

सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तामिळनाडू, केरळ या भागातून हापूस आंबे बाजारात येत आहेत. नऊशे ते बाराशे रूपये प्रति डझन आणि 40 रूपये किलोने हा बाजारात उपलब्ध आहे. तसेच तोतापूरी, लालाबाग, बदामी, गोळा या  आंब्याच्या जातीही उपलब्ध आहेत.

mango chart