ठाण्यात ९७ अनधिकृत नळजोडण्या तोडल्या

पाणीपुरवठा विभागाची मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रात कारवाई
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे,  10 सप्टेंबर 2024
 मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रात भोलेनाथ नगर, खरीवली, देवी नाला, ग्रीन पार्क या भागात एक इंच व्यासाच्या ९७ नळ जोडण्या पाणी पुरवठा विभागाने खंडित केल्या आहेत. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
 
 गेल्या आठवड्यात, पाणी बील वसुलीबाबत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता आणि मीटर रिडर यांची बैठक घेतली. या बैठकीत, मीटर रीडरना साप्ताहिक उद्दीष्ट निश्चित करून देण्यात आले. तसेच, अवैध नळ संयोजने खंडित करण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. अनधिकृत इमारतींमध्ये पाण्याचा वापर सुरू असल्यास त्यावरही गुन्हे दाखल करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले आहेत.
या निर्देशांच्या अनुषंगाने, मुंब्रा व दिवा प्रभागामध्ये कल्याण फाटा येथून ६६० मीमी व ३५० मीमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीमधून दररोज सुमारे ५७ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा होतो. काही नागरिकांनी या मुख्य जलवाहिनीवर अवैधपणे नळ संयोजने घेतल्याचे निर्दशनास आले होते. त्यानुसार ही नळ संयोजने तोडण्याची कारवाई करण्यात आली. याचप्रकारे संपूर्ण महापालिका क्षेत्रात अवैध नळ संयोजने तोडण्यात येणार असल्याचे उपनगर अभियंता (पाणीपुरवठा) विनोद पवार यांनी सांगितले.
========================================================

========================================================