नवी मुंबई महानगरपालिकेत महिला कर्मचाऱ्यांसाठीच्या विशाखा समितीचे पुनर्गठन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 7 सप्टेंबर 2024

 कामाच्या ठिकाणी महिलांबाबत होणाऱ्या विविध छळवणूकीस प्रतिबंध करण्यासाठी केंद्र शासनामार्फत कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम 2013 पारित करण्यात आला आहे. त्यास अनुसरुन नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी/कर्मचारी महिलांसाठी सन 2010 पासून विशाखा समिती स्थापन करण्यात आली आहे.

हे वाचा : तिचा लढा… !

महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार नमुंमपा मधील विशाखा समितीचे पुनर्गठन करण्यात आलेले आहे. त्यानुसार क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या प्र.उप आयुक्त अभिलाषा पाटील-म्हात्रे यांची विशाखा समितीच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून कायदेतज्ज्ञ हेमांगी पाटील यांची अशासकीय सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय विशाखा समितीत 10 सदस्य असून त्यामध्ये 6 महिला अधिकारी – कर्मचारी व शासन निर्णयानुसार 4 पुरुष सदस्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे.

 याशिवाय आरोग्य विभाग व शिक्षण विभाग यांचेकडील अधिकारी, कर्मचारी यांची मोठी संख्या विचारात घेता सदर विभागांतर्गत महिला तक्रार निवारण समिती यापूर्वीच गठीत करण्यात आली असून सदर समिती यापुढेही कार्यान्वित असणार आहे.

हे वाचा : भारतीय मराठा महासंघाच्या नवी मुंबई कार्यकारिणी जाहीर

कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित व आनंदी वातावरणात काम करता यावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका सतर्क असून विशाखा समितीने निर्भीडपणे व सक्षमतेने काम करावे अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिलेल्या आहेत.

========================================================


=======================================================

========================================================