पहिल्या टप्प्यात 50 हजाराहून अधिक महिलांची लाभ रक्कम बॅक खात्यात जमा
दुस-या टप्प्यातही 50 हजारहून अधिक अर्ज पडताळणीअंती पात्र
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 24 ऑगस्ट 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून 1 लाखाहून अधिक अर्ज पात्र झाले असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात 50 हजाराहून अधिक पात्र महिलांच्या बॅंक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांच्या लाभाची रक्कम रू. 3 हजार जमा झालेली आहे. त्यामुळे महिला भगिनींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केल्यानंतर आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या 111 प्रभागांमध्ये योजनेची मदत केंद्रे सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत सुरू करण्यात आली व या केंद्रांव्दारे योजनेचे अर्ज भरून घेण्यात आले. याशिवाय महापालिका क्षेत्रातील 226 अंगणवाड्यांमध्येही अंगणवाडी सेविकांव्दारे महिलांपर्यंत पोहोचून त्यांचे अर्ज भरण्याची कार्यवाही करण्यात आली.
महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाचे समुह संघटक आणि आरोग्य विभागाच्या आशा वर्कर तसेच महिला बचत गटांनाही योजनेचा प्रचार, प्रसार तसेच अर्ज भरून घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचेमार्फत या संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले जात होते व दिवसातून दोन वेळा सातत्यपूर्ण आढावा घेतला जात होता.
पहिल्या टप्प्यातील अर्जांपैकी अर्ज मंजूर झाल्याचा संदेश प्राप्त होऊनही बॅक अकाऊंट आधार कार्ड सीडेड नाहीत अशा 19157 महिलांना त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करून घ्यावे म्हणजे लाभाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा होईल अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अशा महिलांनी आपल्या बँकेत जाऊन आधार कार्ड सीडींग करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
31 जुलैपर्यंत नारीशक्ती दूत ॲपवरून 1990 महिलांचे अर्जांची कागदपत्रे अपूर्ण होती तसेच 1 ऑगस्टपासून नवीन पोर्टल सुरू झाल्यानंतर 6556 महिलांचे अर्जांमधील कागदपत्रे अपूर्ण असल्याचे आढळले. अशा महिलांना कोणती कागदपत्रे अपूर्ण आहेत याबाबतचे संदेश त्यांच्या मोबाईलवर तांत्रिक प्रणालीद्वारे प्राप्त झालेले आहेत. त्या महिलांनी आपली आवश्यक योग्य कागदपत्रे महानगरपालिकेच्या मदत केंद्रांमध्ये जाऊन अथवा अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहचून द्यावीत व ती कागदपत्रे पोर्टलवर नोंदणी करावीत असेही आवाहन करण्यात येत आहे. अशा महिलांपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून पोहोचून त्यांची कागदपत्रे पूर्ण करून घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज सादर केल्यानंतर अर्ज मंजूरीचा संदेश प्राप्त झालेल्या महिलांनी आपले बँक खाते आधार कार्डशी त्वरित संलग्न (Aadhar Seeded) करून घ्यावे आणि या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवावा त्याचप्रमाणे ज्या महिलांची कागदपत्रे अपूर्ण असल्याचे संदेश प्राप्त झालेला आहे अशा महिलांनी आपल्या कागदपत्रांची पूर्तता लवकरात लवकर करावी आणि योजनेचा लाभ प्राप्त करून घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
========================================================