साथरोग आजारांचा प्रसार रोखण्यासाठी विशेष शिबिरांना नागरिकांचा प्रतिसाद

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 21 ऑगस्ट 2024:

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये हिवताप , डेंग्यू तसेच जलजन्य व साथरोग आजाराचा प्रसार रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या 24 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात 20 ऑगस्ट रोजी जाहीर जनजागृती शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांच्या 24 ठिकाणी 12 हजार 848 नागरिकांनी भेट देत आजार प्रतिबंधात्मक माहिती जाणून घेतली. तसेच याठिकाणी 1057 रक्त नमुने घेण्यात आले.

आरोग्य विभागामार्फत 3, 5 व 12 ऑगस्ट रोजी अशाच प्रकारे जाहीर शिबीरे घेण्यात आली होती. 24 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या परिसरात 4 दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरांचा लाभ 27 हजार 299 नागरिकांनी घेतला आहे. या शिबिरांना नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.

या शिबिरांचे वैशिष्टय म्हणजे याठिकाणी ॲनॉफिलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने व डासांच्या अळ्या प्रत्यक्ष दाखवून तसेच घराभोवती व घरांतर्गत असणारी डासोत्पत्ती स्थाने उदा. पाणी साठवून ठेवलेले ड्रम ओढणी, धोतर किंवा साडीच्या कपड्याने बंदिस्त करणे, त्याचप्रमाणे पाणी साठविण्याची भांडी व टाक्या बंदिस्त करणे तसेच त्या आठवड्यातून एक दिवस स्वच्छ करुन कोरड्या करणे, याशिवाय भंगार साहित्य, टायर्स इत्यादी नष्ट करणे, तसेच छतावरील प्लास्टिक शीट, ताडपत्री यामध्ये पाणी साचू न देणे व ताप येताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अशा विविध विषयांवर शिबिरांमध्ये नागरिकांना प्रात्यक्षिकासह माहिती देऊन त्यांची अंमलबजावणी करण्याविषयी प्रोत्साहित करण्यात आले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत डासउत्पत्ती स्थाने शोधणे व ती नष्ट करण्याची कार्यवाही नियमितपणे होत असून नवी मुंबईकर नागरिकांनीही आपल्या घरातील व घराभोवतालच्या संभाव्य डासउत्पत्ती स्थानांकडे लक्ष द्यावे व ती नष्ट करावीत. तसेच आपले घर व परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी उकळून व गाळून पिणे, भाजीपाला स्वच्छ धुवून वापरणे, उघडयावरचे अन्न खाणे टाळणे या गोष्टी काळजीपूर्वक नियमित कराव्यात. याव्दारेच नवी मुंबईत हिवताप / डेंग्यू रुग्णसंख्या व जलजन्य / साथरोग आजारांवर आळा घालणे शक्य  होईल असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

——————————————————————————————————-