प्लास्टिक प्रतिबंधाकडे विशेष लक्ष द्या

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे विभागप्रमुख आढावा बैठकीत निर्देश

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 19ऑगस्ट 2024

 यावर्षीचा गणेशोत्सव ‘प्लास्टिकमुक्त’ असावा ही संकल्पना नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी व्यापक प्रयत्न करावेत व त्या अनुषंगाने गणेशोत्सवाच्या सजावटीत प्लास्टिक, थर्माकोल व फोमचा वापर न करता कागद, कापड व पुनर्वापरयोग्य साहित्याचा वापर करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे आणि त्यादृष्टीने जनजागृती करावी असे निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीप्रसंगी दिले.

ठळक बातमी : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजना -20 ऑगस्ट रोजी नमुंमपा मुख्यालयात आणि 21 व 22 ऑगस्ट रोजी घणसोली आगारात विशेष शिबिर

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता  शिरीष आरदवाड व इतर विभागप्रमुख उपस्थित होते.

गणेशोत्सव मंडळांना सुलभ रितीने मंडप परवानगी प्राप्त व्हावी याकरिता महानगरपालिकेच्या वतीने “इ-सेवा संगणक प्रणाली” सुरु करण्यात आली असून https:// app.nmmconline.in या संकेतस्थळावर मंडळांनी अर्ज करून सहजपणे परवानगी प्राप्त करून घ्यावी याची व्यापक प्रसिध्दी करावी. यादृष्टीने गणेशोत्सव मंडळांच्या विभाग कार्यालय स्तरावर बैठका घ्याव्यात असे आयुक्तांमार्फत निर्देर्शित करण्यात आले.

हे वाचा : तिचा लढा… !

प्लास्टिकमुक्त मार्केट, प्लास्टिकमुक्त शाळा, प्लास्टिकमुक्त कार्यालये करण्याकडे विशेष लक्ष दिले जावे व तशा प्रकारचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इतरही शासकीय कार्यालयांना करावे असे सूचित करतानाच आयुक्तांनी सर्व कार्यालयातील प्लास्टिक बॉटल्सचा वापर थांबवावा व तेथे प्लास्टिक श्रेडींग मशीन्स बसवाव्यात अशा सूचना केल्या.

हे वाचा : कोकणचे वायनाड व्हायला नको !

नागरिकांची वर्दळ असते अशा ठिकाणांचा अभ्यास करुन तेथे आवश्यक प्रमाणात स्वच्छतागृहे निर्माण करण्यावर भर दयावा तसेच महानगरपालिकेच्या शाळा, रुग्णालये व इतर सुविधा इमारती या ठिकाणच्या स्वच्छतागृहांच्या देखरेखीकडे व स्वच्छतेकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. रेल्वे स्टेशन मधील स्वच्छतागृहांचा मोठया प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे त्यांच्या नियमीत स्वच्छतेवर अधिक काळजीपूर्वक व नियमितपणे लक्ष देणे गरजेचे असून त्याबाबत सिडकोला सूचित करावे असेही आयुक्तांनी सांगितले.

उदयानांमध्ये प्लास्टिकबंदी, धुम्रपानबंदीचे फलक नजरेस पडतील असे ठळकपणे प्रदर्शित करावेत तसेच तेथे पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे व पिण्याच्या पाण्याच्या कुलरची व्यवस्था करावी अशाही सूचना आयुक्तांनी केल्या.

रस्त्यांवरील खड्डे भरुन सुधारणा करण्याचे काम तातडीने पूर्ण करुन घ्यावे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी याप्रसंगी दिले.

========================================================


========================================================