कोकणचे वायनाड व्हायला नको !

संग्रहीत फोटो
  • स्वप्ना हरळकर/अविरत वाटचाल
  • नवी मुंबई, 11 ऑगस्ट 2024

केरळमधील वायनाड जिल्ह्यात भूस्खलन होवून मोठी जिवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. काही दिवसांपूर्वी झालेली आपत्ती नैसर्गिक असली तरी पश्चिम घाटाशी संबंधित असल्याने सर्वांना विचार करायला लावणारी आहे. केरळ हा पश्चिम घाटाचा एक भाग आहे आणि या भागात छोट्या मोठ्या प्रमाणात भूस्खलनाच्या घटना घडू लागल्या आहेत. या घटना घडून गेल्यावर आपलं गाव अशा प्रकारच्या आपत्ती पासून सुरक्षित आहे किंवा नाही याबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू होते आणि शंका उत्पन्न होतात.

पश्चिम घाटाचं सौंदर्य हे इथल्या घाट परिसरात आहे. सौंदर्याला नजर लागते म्हणतात त्याप्रमाणे या परिसराकडे अनेक विकासकांचे लक्ष वेधले गेले आणि हा परिसर अनेकांना खुणावू लागला. पर्यटन, उद्योग, विविध विकासकामे यांसाठी इथल्या डोंगरमाथ्यांवर खोदकामं सुरू झाली आहेत. पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशील असणारा हा भाग मानवी हस्तक्षेपामुळे अस्वस्थ झाला आहे. जंगलतोड झाल्यामुळे जमीन घळू लागली आहे. तर काही भागात शेती सोडल्यामुळे जंगलाचं प्रमाण वाढलं आहे तिथे वन्य प्राणी आणि मानव यांच्यातला संघर्ष वाढू लागला आहे. पश्चिम घाट ज्याचा कोकण हा एक भाग आहे तो देखील अशाच प्रकारे भूस्खलनाच्या रेषेवर उभाआहे की काय अशी शंका आता येवू लागली आहे.

वायनाडच्या भूस्खलनाच्या घटनेनंतर कोकणातल्या अनेक भागात याचीच चर्चा सुरू झाली आहे. कोकणातली कित्येक गावातल्या वाड्या या डोंगरमाथ्यांवर आहेत तर काही वाड्या या डोंगराच्या पायथ्याशी आहेत. पिढ्यान पिढ्या इथल्या जमिनी हे शेतकरी कसत आले आहेत. पावसाच्या पाण्यावर होणारी शेती आ़णि त्यानिमित्ताने होणारी जमीनीची मशागत यामुळे जमीन पावसात धरून राहत होती. आता मात्र अनेकांनी रोजगाराच्या शोधात शहराकडे वाट धरली आणि शेती करायचे सोडून दिले परिणामी शेतजमीन विकण्याचे प्रकार सुरू झाले. त्यातही स्थानिकांपेक्षा जास्त मोबदला देणा-यांकजे ओढा वाढला आहे. एकदा जमीन घेतली की तिथे पर्यटन व्यवसाय सुरू करण्यासाठी डोंगराचं सपाटीकरण सुरू होतं आणि विनाशाला सुरूवात होते.

शाळेतल्या अभ्यासात झाडाची मुळं जमीनीला घट्ट धरून ठेवतात, जमीनीची धूप थांबवतात हे सर्व आता केवळ पुस्तकापुरतेच मर्यादित राहिले आहे असं वाटू लागलं आहे. अर्थात कोकणात अशाही काही संस्था आहेत ज्या जंगलाचं, जमिनींचं संवर्धन व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र त्याचं प्रमाण कमी आहे. एकंदरच या सर्वांचा परिणाम परिसंस्थेवर झाल्यामुळे दुर्मिळ या शब्दाची व्याप्ती वाढली आहे. या भागांत पावसाचे प्रमाण जास्त आहे. वर्षांनुवर्षे ते तसंच राहिले आहे मात्र तेव्हा भूस्खलनाच्या घटना घडत नव्हत्या मग आत्ताच अशा घटना का घडू लागल्या आहेत याचाही विचार व्हायला हवा. आपल्या भागात बदलेली एखादी गोष्ट ही पहिल्यांदा लक्षात येते ती तिथल्या ग्रामस्थांच्या. त्यामुळे जमिनीचा एखादा भाग बदलतोय याची जाणीव झाल्यावर तातडीने उपाययोजना करायला हव्यात.

वर्षानुवर्षे जो सह्याद्री आपल्या माथ्यावर पावसाचा, उन्हाचा तडाखा सहन करत उभा आहे. तो आता दुर्देवाने कमजोर होवू लागला आहे का अशी शंका येते. हा संपूर्ण पश्चिम घाट खूप संवेदनशील आहे हे जोपर्यंत आपण पूर्णपणे समजून घेत नाही तोपर्यंत अशा घटना होत राहणार आहेत. याचा अर्थ विकासकामांना विरोधच करायचा असाही होत नाही. मात्र विकासासोबतच त्या परिसराच्या संवर्धनाचा वसाही जपायला हवा. नदी पात्रातली रेती बांधकामसाठी चांगली मानली जाते हे माहित असल्याने त्या रेतीला मोठी मागणी असते. रेती उपसा करण्यासाठी नदीचे पात्र खोल करून पाण्याचा प्रवाहही वाढला आहे. त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झालं आहे. या भागातल्या नद्या, छोटे ओढे हेइथल्या समृध्दी चा महत्वाचा दुवा आहेत. त्यांचं संवर्धन करणे हे आवश्यक आहे.

विकासासाठी मार्ग तयार करताना आपण पुढच्या अनेक पिढ्यांसाठी नैसर्गिक संकटांचाही मार्ग तयार करत नाहीत ना याचा विचार एकदा व्हायला हवा.

========================================================


========================================================