मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण” : “ठाणे जिल्ह्यात 5 लाख 47 हजार 870 अर्जांच्या नोंदी पूर्ण

100% अर्जांची तपासणी पूर्ण; मान्यताप्राप्त अर्ज 4 लाख 76 हजार 258

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे , 7 ऑगस्ट 2024

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” ही योजना राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून ठाणे जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी, या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणतीही प्रशासकीय क्लिष्टता न आणता सुलभता आणावी, अशा प्रकारच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्याला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त भगिनींचा या योजनेमध्ये सहभाग नोंदवून ठाणे जिल्हा राज्यात अव्वल राहील, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाला केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी अत्यंत कठोर परिश्रम घेत “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेची यशस्वी अंमलबजावणी करीत असल्याचे दिसून येत आहे.

 “मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत 6 ऑगस्ट 2024 रोजी पर्यंत जिल्ह्यात 5 लाख 47 हजार  870 अर्जांच्या नोंदी झाल्या असून 100% अर्जांची तपासणी पूर्ण झाली आहे. यापैकी मान्यताप्राप्त अर्जांची संख्या 4 लाख 76 हजार 258 इतकी असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे.

गेले काही दिवस ठाणे जिल्हा प्रशासनातील महिला व बालविकास विभागासह अन्य विविध विभाग, सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती मधील अधिकारी-कर्मचारी एकवटून या योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांवर अक्षरश: दिवसरात्र कार्यवाही करीत होते.

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात जिल्हाधिकारी शिनगारे यांनी जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सर्व महसूल यंत्रणांच्या वेळोवेळी बैठका घेवून या योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने होत असलेल्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला होता. त्यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, सर्व महानगरपालिका आयुक्त, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, प्रकल्प अधिकारी तसेच महिला बचतगट, एकात्मिक बालविकास अधिकारी, प्रभाग अधिकारी, कर संकलन अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका त्याचबरोबर इतर विभागांच्याही अधिकारी-कर्मचारीवर्गाची मोलाची साथ लाभली. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वांनी रात्रंदिवस परिश्रम घेवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्याची कामगिरी कौतुकास्पद

“मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत  6 ऑगस्ट 2024 रोजी पर्यंत जिल्ह्यात 5 लाख 47 हजार  870 अर्जांच्या नोंदी झाल्या असून 100% अर्जांची तपासणी पूर्ण झाली आहे. यापैकी मान्यताप्राप्त अर्जांची संख्या 4 लाख 76 हजार 258 इतकी असून 70 हजार 45 अर्ज हे त्रुटीयुक्त आहेत. तर 875 अर्ज रद्द करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात मुरबाड तालुक्याची उत्तम कामगिरी

जिल्ह्यात मुरबाड तालुक्याने उत्तम कामगिरी केली असून 38 हजार 308 अर्जांपैकी मान्यताप्राप्त अर्ज संख्या 37 हजार 886 आहे. तर त्रुटीयुक्त 390 अर्ज असून रद्द करण्यात आलेल्या अर्जांची संख्या 22 आहे. यानुसार जिल्ह्यात सर्वाधिक मान्यताप्राप्त प्रकरणांची टक्केवारी मुरबाड तालुक्याची आहे. ही टक्केवारी 98.90 टक्के आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय नोंदी झालेली अर्ज संख्या आणि मान्यताप्राप्त अर्जांची टक्केवारी:-

 ठाणे तालुक्याने 1 लाख 87 हजार 900 अर्जांच्या नोंदी केल्या. त्यापैकी 1 लाख 87 हजार 900 अर्जांची तपासणी पूर्ण केली. यापैकी मान्यताप्राप्त अर्ज संख्या 1 लाख 62 हजार 22 आहे. तर त्रुटीयुक्त 25 हजार 229 अर्ज असून रद्द करण्यात आलेल्या अर्जांची संख्या 245 आहे. यानुसार ठाणे तालुक्यातील मान्यताप्राप्त प्रकरणांची टक्केवारी 86.23 टक्के आहे.

उल्हासनगर तालुक्याने 36 हजार 417 अर्जांच्या नोंदी केल्या. त्यापैकी 36 हजार 417 अर्जांची तपासणी पूर्ण केली. यापैकी मान्यताप्राप्त अर्ज संख्या 27 हजार 593 आहे. तर त्रुटीयुक्त 8 हजार 592 अर्ज असून रद्द करण्यात आलेल्या अर्जांची संख्या 10 आहे. यानुसार उल्हासनगर तालुक्यातील मान्यताप्राप्त प्रकरणांची टक्केवारी 75.77 टक्के आहे.

कल्याण तालुक्याने 1 लाख 6 हजार 657 अर्जांच्या नोंदी केल्या. त्यापैकी 1 लाख 6 हजार 657 अर्जांची तपासणी पूर्ण केली. यापैकी मान्यताप्राप्त अर्ज संख्या 90 हजार 893 आहे. तर त्रुटीयुक्त 15 हजार 590 अर्ज असून रद्द करण्यात आलेल्या अर्जांची संख्या 156 आहे. यानुसार कल्याण तालुक्यातील मान्यताप्राप्त प्रकरणांची टक्केवारी 85.22 टक्के आहे.

भिवंडी तालुक्याने 82 हजार 319 अर्जांच्या नोंदी केल्या. त्यापैकी 82 हजार 319 अर्जांची तपासणी पूर्ण केली. यापैकी मान्यताप्राप्त अर्ज संख्या 72 हजार 754 आहे. तर त्रुटीयुक्त 9 हजार 341 अर्ज असून रद्द करण्यात आलेल्या अर्जांची संख्या 218 आहे. यानुसार भिवंडी तालुक्यातील मान्यताप्राप्त प्रकरणांची टक्केवारी 83.38 टक्के आहे.

अंबरनाथ तालुक्याने 50 हजार 866 अर्जांच्या नोंदी केल्या. त्यापैकी 50 हजार 866 अर्जांची तपासणी पूर्ण केली. यापैकी मान्यताप्राप्त अर्ज संख्या 46 हजार 791 आहे. तर त्रुटीयुक्त 3 हजार 942 अर्ज असून रद्द करण्यात आलेल्या अर्जांची संख्या 119 आहे. यानुसार अंबरनाथ तालुक्यातील मान्यताप्राप्त प्रकरणांची टक्केवारी 91.99 टक्के आहे.

शहापूर तालुक्याने 45 हजार 403 अर्जांच्या नोंदी केल्या. त्यापैकी 45 हजार 403 अर्जांची तपासणी पूर्ण केली. यापैकी मान्यताप्राप्त अर्ज संख्या 38 हजार 319 आहे. तर त्रुटीयुक्त 6 हजार 961 अर्ज असून रद्द करण्यात आलेल्या अर्जांची संख्या 105 आहे. यानुसार उल्हासनगर तालुक्यातील मान्यताप्राप्त प्रकरणांची टक्केवारी 84.40 टक्के आहे.

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” ही योजना महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिलांपर्यंत योजनेची माहिती पोहोचविणे, त्यांची नोंदणी करून घेणे व आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून घेणे, यासाठी सर्वच विभागांनी व्यवस्था केली होती. या योजनेसाठी लागणारे दाखले नागरिकांना मिळण्यासाठी तहसिलदारांनी योग्य त्या सुविधा निर्माण केल्या होत्या. प्रभाग अधिकारी, कर संकलन अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आदींनी एकत्रित कामे केली. शहरी भागात प्रत्येक प्रभाग कार्यालयात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या. या योजनेतील सहभागासाठी कोणत्याही भगिनीला अडचण येणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घेण्यात आली होती.

पुढील महिन्याभरात आणखी काही महिला वंचित राहिल्या आहेत का, याची तपासणी करून उर्वरित महिला भगिनींची देखील नोंदणी करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी सांगितले आहे.

========================================================

=======================================================