उमेदवारीवरून राष्ट्रवादीत मतभेद

मुंबई,ता.12 जानेवारी 2017/AV News Bureau:

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळावी यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये खेचाखेची सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण आणि उत्तर पश्चिम मुंबईचे जिल्हाध्यक्ष अजित रावराणे यांच्यात पालिका निवडणुकीच्या उमेदवारीवरून गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दोघांनाही समज दिल्याचे समजते.

मुंबई महापालिकेसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपली पहिली यादी जाहीर करून निवडणुकीच्या रिंगणात आधी पाऊल टाकले आहे. त्यातच आता पक्षाने दुसरी यादी तयार केली आहे. यामध्य दिंडोशी मतदारसंघातील उमेदवारांची निवड करताना आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली नसल्याचा आक्षेप विद्या चव्हाण यांनी घेतला आहे. या प्रभागांमध्ये रावराणे यांनी आपल्या समर्थकांनाच उमेदवारी दिल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या सभेत माजी खासदार संजय पाटील आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्यात झालेल्या वादाचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा एकदा पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. याची गंभीर दखल घेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करून निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील वाद चव्हाट्यावर आणू नका, अशी समज चव्हाण आणि रावराणे यांना दिल्याचे समजते.