- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 17 जून 2024
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात डिसेंबर 2023 पर्यंत रिक्त झालेल्या 185 पोलीस शिपाई पदासाठी रिक्त झालेल्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी 19 जून ते 26 जून या कालावधीत कळंबोली इथल्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर यासाठी मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. यामध्ये 19 जून ते 24 जून या कालावधीत पुरूष उमेदवार आणि माजी सैनिक यांची तर 25 जून ते 26 जून या कालावधीत महिला उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी आतापर्यंत 6 हजार उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यामध्ये साडे चार हजार पुरूष, 1500 महिला उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
Lead Story : आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्हयांवर लक्ष
या भरती प्रक्रियेसाठी रायगड, ठाणे, कोकण भागातून अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, छत्रपती संभाजी नगर, विदर्भ भागातल्या काही जिल्ह्यांमधील उमेदवारांनीही अर्ज केले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत दक्षता अधिकारी म्हणून पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहराच्या बाहेरून येणाऱ्या उमेदवारांसाठी पनवेल, मानस सरोवर, सीबीडी रेल्वे स्थानकातून मुख्यालयाच्या मैदानात पर्यंत पोहोचण्यासाठी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Lead Story : किनारपट्टी सुरक्षेसाठी सागर रक्षक एप (App)
पोलीस भरती मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. यामध्ये डिजीटल उंची, छाती मोजमाप घेण्यासाठी फिजीकल स्टॅन्डर्ड मशिन PST Machinne चा वापर करण्यात येणार आहे. तसेच मैदानी चाचणीसाठी रेडिओ फ्रिक्वेन्सीशी संबंधित असलेल्या RFID तंत्रज्ञांनाचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी तेलंगाना इथल्या कंपनीची मदत घेण्यात आली आहे.
पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान काही तक्रारी असल्यास उमेदवारांच्या सोयीसाठी पोलीस महासंचालक नियंत्रण कक्षांच्या दूरध्वनी कमांकाचे फलक जागोजागी लावण्यात आलेले आहेत.
भरती प्रक्रियेवर विशेष लक्ष
भरती प्रक्रियेदरम्यान दलालांमार्फत होणारा भ्रष्टाचार व गैरव्यवहार रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग दक्ष राहणार आहे. तसेच गुन्हे शाखा व विशेष शाखा यांची स्वतंत्र पथके तयार करून भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. या प्रक्रियेत नेमण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मोबाईल फोनचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
========================================================
========================================================