- सिद्धार्थ हरळकर/ अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 9 जून 2024
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपचा मोठा अपेक्षाभंग झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. शिवाय दिल्लीत जावून उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून आपणास मुक्त करण्याची विनंती पक्ष नेतृत्वाला केली. फडणवीस यांच्या या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडालीच, परंतु स्थानिक भाजप नेत्यांनाही फडणवीसांच्या भूमिकेवर कशाप्रकारे प्रकट व्हावे हे कळायला थोडा वेळ लागला.
फडणवीसांनी स्वतःहून पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्रीपद सोडायचीच इच्छा व्यक्त केल्यानंतर आधीच पराभवाने खचलेल्या भाजप नेत्यांना काय करावे हे उमजेना. शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी आता अशाप्रकारचे कोणतेही पाऊल उचलू नये अशी विनंती केली. तसेच प्रत्यक्ष केंद्रीय नेते अमित शाह यांनीदेखील फडणवीस यांना तसे न करण्याची सूचना केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या या स्मार्ट खेळीने राज्यातील पराभवाचे खापर पक्षाच्या नेत्यांकडून आपल्यावर फोडण्याआधीच स्वतःला सुरक्षित केलेच शिवाय पक्षाच्या आगामी वाटचालीची दशादिशा ठरविण्याची जबाबदारीही पुन्हा आपल्याकडे कशी राहील,याची व्यवस्था केली.
भाजपची सध्याची अवस्था लक्षात घेता देवेंद्र फडणवीस यांना राज्यात सक्षम पर्याय दिसत नाही. तसेच केंद्रात स्थिरावलेल्या नितीन गडकरी यांनी आपण राज्यात परतणार नसून केंद्रातच राहणार असे सांगत केंद्रातील सत्ता स्पर्धेत असल्याचे संकेत दिलेले आहेत.
आतापर्यंत राज्यात भाजपला मिळालेल्या यशात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हात आहे. तोडाफोडीच्या राजकारणाचे केंद्रबिंदूही तेच राहीलेले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत योग्य मोर्चेबांधणी करून लोकसभा निवडणुकीतील नुकसानीची भरपाई करण्यासाठी नेतृत्व त्यांना पुन्हा संधी देईल, अशी अपेक्षा आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने देशातून मोदी लाट ओसरल्याचे दिसून येते. त्यामुळे तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला आंध्रप्रदेशातील चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसम तसेच बिहारमधील नितीन कुमार यांच्या जेडीयुची सोबत घेणे क्रमप्राप्त आहे. त्यांच्या मदतीनेच मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. मात्र पूर्वीसारखी दांडगाई करणे भाजपला परवडणारे नाही. सतत अस्थिरतेची टांगती तलवार डोक्यावर असल्याकारणाने सध्या कुणालाच न दुखावण्याची खबरदारी अमित शाह आणि नरेंद्र मोदी घेतील. कारण निवडणुकीच्या कालात भाजपच्या काही नेत्यांनी थेट संघाबाबत धाडसी टिप्पणी करून संघ परिवाराची नाराजी ओढवून घेतलेली आहे. अशावेळी संघाच्या मर्जीतील नितीन गडकरी असो वा देवेंद्र फडणवीस यांना बाजूला सारून स्वतःची बाजू कमकुवत करण्याचा प्रयत्न भाजपचे केंद्रीय नेतृत्व नक्कीच करणार नाही याची जाणीव देवेंद्र फडणवीस यांनाही असणार आहे.
लोकसभा निवडणुकीने सद्या भाजपला काहीसे बॅकफुटवर नेऊन ठेवले आहे. भाजपच्या नेतृत्वात सरकार जरी स्थापन झाले असले तरी पुढील पाच वर्षे दोन अशा नेत्यांना घेऊन संसार करावा लागणार आहे, ज्यांना भाजपने त्रास दिलेला आहे. हे दुःख चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या मनात सलत असणारच आहे. शिवाय इंडिया आघाडीला देशभरात मिळालेले यश हे पुढील राजकारणाचा कल कसा असणार आहे याचे चित्र स्पष्ट करणारे आहे.
शिवसेनेत बंड करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही या निवडणुकीत चांगले यश मिळालेले आहे. सुरुवातील चाचपडणारे एकनाथ शिंदे आता आत्मविश्वासाने वागू लागले आहेत. लोकसभेतील यशाने त्यांचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असणार.सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्यानंतरच बोलणारे एकनाथ शिंदे आता कुणाच्याही मार्गदर्शनाची वाट बघत नाहीत. तसेच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचाही आता त्यांच्यावर विश्वास बसला आहे. ही बाब देवेंद्र फडणवीस यांच्याही लक्षात आली असणार. त्यामुळे स्वतःचे वजन कायम ठेवायचे असल्यास कसे वागायचे हे फडणवीसांना चांगलेच ठाऊ आहे आणि त्यानुसार त्यांनी आपली भूमिका घेत राज्यातली आपली पकड सध्यातरी मजबूत केली आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पुढे कदाचित अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पक्षांतर्गतच नाराजीची भावना निर्माण झाली तर संघ परिवार अशा नेत्यांची बाजू घेईल, ज्यांना मूळ भाजपवासी आणि संघ परिवार स्वीकारेल तसेच इतर मित्र पक्षांनाही ते जवळचे वाटतील. अशावेळी नितीन गडकरी यांचे नाव पुढे आल्यास भाजपचे इतर नेतेही त्यांच्या नावाला पाठींबा देण्याची शक्यता अधिक आहे. म्हणजे केंद्रात नितीन गडकरी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस असे चित्र भविष्यात दिसले तर आश्चर्य वाटणार नाही.
फडणवीस तरुण असल्यामुळे त्यांच्यापुढे मोठी राजकीय वाटचाल आहे. अशावेळी पक्षांतर्गत राजकारणात त्यांनी दाखविलेली मुत्सद्देगिरी त्यांना राजकारणात यापुढेही केंद्रस्थानी ठेवेल यात शंका नाही. राजिनामा देण्याची चाल चालत त्यांनी आपल्या राजकीय चतुराईचा दाखला दिलाच आहे.
========================================================
========================================================