जागतिक पर्यावरण दिनी नवी मुंबईत ठिकठिकाणी लोकसहभागातून देशी वृक्षारोपण

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई,  5 जून 2024

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सर्वच विभागांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  नवी मुंबई महानगरपालिका उदयान विभागाच्या वतीने नवी मुंबईच्या जैवविविधतेत भर पडेल अशा कांचन, चिंच, मोहगना पारिजात, सिताफळ, जांभूळ, निंब, आंबा, बांबू या देशी वृक्षारोपांची लागवड करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उदयान विभागाने यावर्षी करावयाच्या वृक्षारोपणाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सदयस्थितीत वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध्‍ असलेल्या 35 हजारहून अधिक देशी वृक्षरोपांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले असून त्यानुसार आज जागतिक पर्यावरण दिनी लोकसहभागातून आठही विभाग क्षेत्रात वृक्षारोपण मोहिमा हाती घेण्यात आल्या आहेत.

तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळ वृक्षसंपदेने हरीत असावे या आयुक्त महोदयांच्या संकल्पनेतून येथे देशी वृक्षारोपण करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड यांच्यासह उद्यान विभागाचे उपआयुक्त  दिलीप नेरकर, परिमंडळ 1 चे उपआयुक्त  सोमनाथ पोटरे, तुर्भे विभागाचे सहा. आयुक्त  भरत धांडे, कार्यकारी अभियंता राजेश पवार तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी सतीश पडवळ व उप प्रादेशिक अधिकारी  जयंत कदम, ठाणे बेलापूर औद्योगिक संघटनेचे महाव्यवस्थापक मंगेश ब्रह्मे आणि इतर उपस्थितांच्या शुभहस्ते याठिकाणी मोठ्या संख्येने देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. त्याचप्रमाणे उपस्थितांनी माझी वसुंधरा अभियानाची पर्यावरण संरक्षण संवर्धन शपथ ग्रहण केली.

बेलापूर विभाग कार्यक्षेत्रातील तलया येथील कांदळवन भागात नवी मुंबई महानगरपालिका व हेंकेल ग्रुप आणि महाविद्यालयीन एनएसएसचे विद्यार्थी यांच्या एकत्रित सहभागातून विशेष साफसफाई मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत सहभागी होत महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी उपस्थितांना स्वच्छतेचे आणि पर्यावरणाचे महत्व विषद केले. याप्रसंगी परिमंडळ 1 उपआयुक्त सोमनाथ पोटरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त  शशिकांत तांडेल यांनी सक्रिय सहभाग घेतला. उपस्थितांनी सामुहिकरित्या माझी वसुंधरा अभियानाची सामुहिक शपथ घेतली. या मोहिमेत सहभागी सर्व स्वयंसेवकांनी कांदळवन क्षेत्रातील साधारणत: 100 कि.ग्रॅ. प्लास्टिक व तत्सम कचरा गोळा केला.

नेरूळ विभागात पोलीस स्टेशन समोरील जागेत लोकसहभागातून देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये विशेषत्वाने 150 बांबूची रोपे लावण्यात आली. याप्रसंगी नेरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी भगत यांच्यासमवेत पोलीस अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. नेरूळ विभागाचे सहा. आयुक्त डॉ. अमोल पालवे, उद्यान विभागाच्या सहा. आयुक्त ऋतुजा गवळी, मृदू व जलसंधारण विभागाचे माजी सचिव  सुनील चव्हाण, विधी विभाग अधिकारी डॉ रमेश साळवे, रोजगार हमी योजना विभागाचे सहायक संचालक विजयकुमार कलवले, स्वच्छता अधिकारी  दिनेश वाघुळदे व स्वच्छता निरीक्षक आणि उद्यान सहाय्यक पडवळ यांच्या समवेत नागरिकांनी सहभागी होत याठिकाणी वृक्षारोपण केले.

नेरूळ विभागातच सारसोळे जेट्टी येथे कांदळवन विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत एस के कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स नेरूळ व एस आय ई एस कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज नेरूळ यांच्या एनएसएस युनिटचे विद्यार्थी स्वयंसेवक व स्वच्छ्ता दूत यांनी परिसरातील प्लास्टिक व पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेले तत्सम साहित्य गोळा केले. यावेळी उपस्थित नेरुळ विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अमोल पालवे व स्वच्छता अधिकारी  दिनेश वाघुळदे यांच्यासह उपस्थितांनी माझी वसुंधरा अभियान सामुहिक शपथ घेतली.

त्याचप्रमाणे ज्वेल ऑफ नवी मुंबई या आकर्षण केंद्रस्थळी एमजीएम विधी महाविदयालयाच्या प्राचार्य, प्राध्यापक तसेच वृक्षप्रेमी विद्यार्थी यांच्या सहयोगाने वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी नमुंमपा उद्यान विभागाच्या सहाय्यक आयुक्त ऋतुजा गवळी, उद्यान अधिक्षक भालचंद्र गवळी, पडवळ, बांगर तसेच पर्यावरणप्रमी नागरिक उत्साहाने उपस्थित होते.

 

वाशी से.10 येथील स्व.मीनाताई ठाकरे उद्यान, मिनी सी शोअर येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात  कर्मवीर  भाऊराव  पाटील महाविद्यालय वाशी मधील एनसीसीचे विद्यार्थी व एनएसएसचे विद्यार्थी तसेच वाशी विभागातील नागरिक मोठया संख्येने सहभागी  झाले होते.  यावेळी उपस्थित सर्वांनी वाशी विभागाचे सहा. आयुक्त सागर मोरे, स्वच्छ्ता अधिकारी  म्हात्रे व उद्यान सहाय्यक  प्रशांत उरणकर यांच्या उपस्थितीत माझी वसुंधरा अभियान शपथ घेतली.

तुर्भे विभागांतर्गत सानपाडा क्षेत्रातील सिताराम मास्तर उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिक संघ सानपाडा तसेच बंड्स  कॉलेजचे विद्यार्थी यांच्या एकत्रित सहयोगातून वृक्षारोपण करण्यात आले तसेच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांसह माझी वसुंधरा अभियानाची शपथ घेण्यात आली. याप्रसंगी एशियन पेंट्स यांच्या वतीने तुर्भे विभाग क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या स्वच्छता दूत यांना गोलाकार गावस्कर कॅपचे वाटप करण्यात आले. यावेळी विभागातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्तेही मोहीमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ.अजय गडदे, तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त  भरत धांडे, स्वच्छता अधिकारी  जयेश पाटील यांच्यासह सर्वानी माझी वसुंधरा अभियानाची सामुहिक शपथ घेतली. सिताराम मास्तर उद्यानाप्रमाणेच सानपाडा येथील संवेदना उद्यान याठिकाणीही नागरिकांच्या सहभागातून देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली.

कोपरखैरणे विभाग कार्यालय क्षेत्रात सेक्टर 14 येथील निसर्गोद्यानात 200 हून अधिक आम्र वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. या वृक्षारोपणाप्रसंगी पर्यावरणप्रेमी नागरिक व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उद्यान विभागाचे उपआयुक्त दिलीप नेरकर, कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त सुनिल काठोळे, उद्यान अधिक्षक विजय कांबळे व प्रकाश गिरी, उपअभियंता शिकतोडे व इतर कर्मचारी यांनीही नागरिकांसमवेत वृक्षारोपण मोहीमेत सहभाग घेतला.

घणसोली विभाग कार्यक्षेत्रात सहा. आयुक्त संजय तायडे यांच्या नियंत्रणाखाली घणसोली सेक्टर 3 येथील सेंट्रल पार्क तसेच पाम बीच रोड से.1 लगत देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी स्वच्छता अधिकारी विजय पडघन, उद्यान अधिक्षक रोहेकर तसेच उपस्थित नागरिकांनीही वृक्षारोपण केले.

ऐरोली विभागातही ऐरोली विभागाचे सहा. आयुक्त अशोक आहिरे तसेच कार्यकारी अभियंता  मदन वाघचौडे, उपअभियंता गजानन पुरी व बंधु शिरोसे, उप मुख्य स्वच्छता अधिकारी राजेद्र इंगळे, उद्यान सहाय्यक  पुनम नवले तसेच इतर अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत ऐरोली विभाग कार्यालय परिसरात कडूनिंबांची झाडे लावण्यात आली. त्याचप्रमाणे ऐरोली, से-18 येथील रामदास बापु पाटील उदयानात ज्येष्ठ नागरिक संघटना, ब्रम्हकुमारी संस्था यांच्या सहयोगाने वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. ऐरोली सेक्टर -14 येथील नमुंमपा शाळा मैदानात शालेय विदयार्थी तसेच सामाजिक पर्यावरणप्रेमी आणि सखी महिला यांच्या सहयोगाने कडुनिंबाची 50 वृक्षरोपे लावण्यात आली. पटनी रोड येथेही नेवा गार्डन सोसायटीपासून दिघ्याकडे जाणा-या रस्त्याच्या कडेला 100 नग कडूनिंबच्या झाडांचे मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांच्या सहभागातून वृक्षरोपण करण्यात आले.

दिघा विभागात तलावानजिकच्या साने गुरुजी उद्यानात परिमंडळ 2 चे उपआयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांच्यासह मुख्य स्वच्छता अधिकारी सतीश सनदी व इतर अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक यांच्या उपस्थितीत देशी वृक्षरोपांचे रोपण करण्यात आले.

वृक्षारोपण व स्वच्छता मोहिम पार पडलेल्या सर्वच ठिकाणी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरण रक्षण व संवर्धनाची शपथ ग्रहण करण्यात आली.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यासाठी नागरिकांना वृक्षरोपे व आवश्यकता असल्यास वृक्षरोपे लावण्यासाठी जागा नमुंमपा उदयान विभागाच्या वतीने उपलब्ध्‍ करुन दिली जातील असे 1 जून रोजी आवाहन करण्यात आले होते त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून 160 हून अधिक नागरिक व संस्थांनी 12 हजाराहून अधिक देशी वृक्षरोपे महानगरपालिकेकडून प्राप्त करुन घेतली आहेत. त्याचेही स्वतंत्र कार्यक्रम त्या त्या व्यक्ती / संस्थेमार्फत घेण्यात आले. यापुढील पावसाळी कालावधीत ज्या नागरिकांना तसेच संस्थांना लागवडीसाठी वृक्षरोपांची आवश्यकता असेल त्यांनी ऋतुजा गवळी, सहा.आयुक्त (उद्यान) यांना 7977630063 या क्रमांकावर तसेच प्रकाश गिरी, उद्यान अधिक्षक यांना 9322912801 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

========================================================


========================================================