- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 2 जून 2024
वाशीमधील महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयातील पेडियाट्रिक थॅलेसेमिया विभागामध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली होती. या दुर्घटनेनंतर नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्षांनी या रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयातील ऑक्सीजन आणि इलेक्ट्रिक यंत्रणेचे ऑडिट झाले नसल्याचे सांगत ऑडिट न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मुळातच ऑक्टोबर महिन्यात येऊ घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही भाजपाची स्टंटबाजी असून महापालिका स्थापनेपासून महापालिकेवर एकहाती सत्ता असणाऱ्या भाजपला आत्ताच या उणिवा दिसत असून लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी केला आहे.
नवी मुंबईच्या स्थापनेपासून ज्यांची महापालिकेवर सत्ता आहे, त्यांनी महापालिका प्रशासनाला इशारा द्यावा, ही एक प्रकारची नौटंकी आहे. ज्यांनी जनता दरबार भरविले, कोरोना काळात व त्यानंतरही महापालिका आयुक्तांच्या भेटीला माजी नगरसेवकांचा तांडा व कार्यकर्त्यांचा लवाजमा जे घेऊन जातात, त्यांना इशारा देण्याची वेळ यावी, याचा अर्थ त्यांचा प्रशासनावर अकुंश नाही अथवा प्रशासन त्यांना जुमानत नाही, अशी टिकाही रविंद्र सावंत यांनी केली आहे.
भाजपा जिल्हाध्यक्षांना जर प्रथम संदर्भ रुग्णालयातील घटनेचा जर खरोखरीच कळवळा असता, त्यांनी साधेपणाने रुग्णालयास भेट देवून समस्येबाबत व असुविधांबाबत माहिती घेणे आवश्यक होते. रुग्णालयातील पेडियाट्रिक थॅलेसेमिया विभागामध्ये कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन जाण्याची काय गरज होती? सर्वसामान्य रुग्नांना भेटण्यासाठी त्या वॉर्डमध्ये जाण्याकरता रुग्णांच्या नातलगांना किती द्राविडी प्राणायाम करावा लागतो. या ठिकाणी इतक्या लोकांना जाण्यासाठी महापालिका प्रशासनाने परवानगी दिलीच कशी? निव्वळ स्टंटबाजी आणि मीडियामध्ये चमकण्यासाठी ही सुरु असलेली केविलवाणी धडपड असल्याची टीका रविंद्र सावंत यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
नवी मुंबईकरांच्या आरोग्याची खरोखरीच इतकी काळजी असती तर त्यांना प्रथम संदर्भ रुग्णालयाचा जवळपास अर्धा हिस्सा फोर्टिजला भाड्याने दिलाच नसता. नवी मुंबई शहरातील लोकसंख्या आजही वाढत आहे. आरोग्य सुविधा देण्यासाठी आता असलेले प्रथम संदर्भ रुग्णालय अपुरे पडणार ही साधी दूरदृष्टीही त्यांना नसावी याचा खेद वाटतो. नवी मुंबईच्या दोन्ही आमदारांनी रुग्णालयीन समस्या आजवर त्यांनी कधी सोडविल्या आहेत? कधी रुग्णालयीन समस्यांबाबत आवाज प्रशासन दरबारी कधी उठविला आहे? महापालिका आयुक्तांना भेटायला जाणाऱ्या नवी मुंबईच्या दोन्ही आमदारांनी आयुक्तांकडे आरोग्याबाबत किती वेळा आवाज उचलला आहे? फायर ऑडिटची किती वेळा मागणी केली आहे? असा प्रश्न रविंद्र सावंत यांनी विचारला आहे.
========================================================
========================================================