नाल्यातील राडारोडा फ्लेमिंगोंच्या जीवावर , ५ फ्लेमिंगोंचा मृत्यू

5 फ्लेमिंगोच्या मृत्यू नंतर तलाव परिसराची मॅनग्रोव्ह सेल, बीएनएचएस कडून पाहणी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई,  25 एप्रिल 2024 

नवी मुंबईतल्या सीवूडस परिसरात पाम बीच मार्गालगत असणाऱ्या तलावातील गाळ आणि प्रकाश प्रदुषणामुळे ५ फ्लेमिंगोंचा मृत्यू तर ७ फ्लेमिंगो जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर प्राणी प्रेमी तसेच पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौैकशी करून फ्लेमिंगोंच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

सीवूड पामबीच मार्गालत एनआरआय संकूलाच्या शेजारी असणाऱ्या तलावातील गाळात अनेक फ्लेमिंगो अडकल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. गुरूवारी 25 एप्रिल रोजी 5 फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी शुक्रवारी 26 एप्रिल रोजी नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे उपसंचालक डॉ. राहुल खोत, मॅनग्रोव्ह सेल मुंबईचे विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, नवी मुंबई महापालिका अधिकारी यांच्यासोबत नॅट कनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बि. एन. कुमार यांनी या तलाव परिसराची पाहणी केली.

यावेळी भरतीचे पाणी या तलावाला जोडणाऱ्या नाल्यात मोठ्या प्रमाणात बांधकामाचा राडारोडा अडकून पडला आहे. त्याचा परिणाम भरतीच्यावेळी खाडीतून येणारे पाणी नाल्यांद्वारे तलावात येण्यास अटकाव होत आहे. त्यामुळे  तलावातल्या पाण्याची पातळी कमी होवून गाळ निर्माण झाला आहे. अन्नाच्या शोधत येणारे फ्लेमिंगो या गाळात अडकत आहेत त्यामुळे त्यांचं जखमी होण्याचं प्रमाण वाढलं आहे. तसंच पथदिव्यांच्या प्रकाशामुळे पक्षांची दिशाभूल झाली असावी आणि त्यामुळे काही पक्षी पहाटे रस्त्यावर उतरले असावेत अशी प्राथमिक शक्यता असल्याची माहिती बीएनएचएससचे डॉ. खोत यांनी यावेळी दिली. तसेच त्यांनी महापालिका अभियंत्यांना पाम बीच रोडपासून डीएसपी शाळेच्या दिशेने आणि नंतर नेरुळ जेट्टी रस्त्याजवळील दिव्यांचा रोख बदलण्याची सूचना केली.


मँग्रोव्ह सेल-मुंबईकडून वनविभागाच्या पथकाने सर्व प्रवेशद्वारांची तपासणी केली. ते आपला अहवाल मॅन्ग्रोव्ह सेलचे प्रमुख आणि अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक व्ही एस रामाराव यांना सादर करणार आहेत.

दरम्यान,  पाहणी दाैऱ्यात खाडी आणि तलावाला जोडणाऱ्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राडारोडा अडकून पडल्यामुळे पाण्याचा प्रवाह रोखला जात आहे असे प्राथमिक पाहणीत आढळून आले आहे.  त्यामुळे तलावातील पाण्याचा प्रवाह सुरळीत व्हावा यासाठी नाल्यात अडकलेला राडारोडा साफ करण्यात येईल, अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे सीबीडी बेलापूर विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी दिली.

========================================================


========================================================