लोकसभा निवडणूक-2024 : ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकेची सुविधा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क 
  • ठाणे,  21मार्च 2024

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 85 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मतदारांना व 40 टक्क्यांहून अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ही सुविधा ऐच्छिक आहे, अशी माहिती माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे.

TOP NEWS : आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्हयांवर लक्ष – नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे

मतदारयादीमध्ये ज्या मतदारांचे वय 85 वर्षे पेक्षा जास्त आहे, ज्या मतदारांची नोंद दिव्यांग अशी करण्यात आली आहे, अशा मतदारांना ही सुविधा मिळणार आहे. दिव्यांग मतदारांच्या बाबतीत मतदाराचे अपंगत्व 40 टक्क्यापेक्षा जास्त आहे, असा सक्षम प्राधिकारी यांचा दाखला असणे आवश्यक आहे. मतदान केंद्रनिहाय अशा मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत नमुना 12 ड चे वाटप घरोघरी करण्यात येत आहे. या नमुन्यामध्ये अर्ज करणाऱ्या मतदाराला त्यांच्या घरी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. नमुना 12 ड मध्ये आवश्यक सर्व माहिती भरुन ती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत दि.16 मार्च 2024 रोजी आचारसंहिता घोषित झाल्यापासून हा फॉर्म 12 ड चे वितरण सुरु आहे. 17 एप्रिल 2024 पर्यंत तो आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करावा. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या कालावधीत हा नमुना 12 ड मधील अर्ज स्वीकारण्यासाठी या मतदारांना घरोघरी भेट देत आहेत.

विशेष लेख : आईचा अधिकार

टपाली मतपत्रिकेची मागणी करणाऱ्या अशा मतदाराला त्याचे मत फक्त टपाली मतपत्रिकेद्वारेच नोंदवता येईल. अशा मतदाराला मतदान केंद्रावर मतदान करण्याचा हक्क असणार नाही. घरोघरी मतदान करण्यासाठीचे पथक पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार टपाली मतपत्रिकेची सुविधा मागणी करणाऱ्या मतदाराच्या घरी भेट देईल. असा मतदार या भेटीच्या वेळी अनुपस्थित असल्यास हे पथक एका अंतिम संधीसाठी मतदाराच्या घरी भेट देईल. दुसऱ्या भेटीच्या वेळी सुद्धा मतदार उपस्थित नसल्यास अशा मतदाराला टपाली अथवा मतदान केंद्रावर मतदानाची संधी मिळणार नाही. या सुविधेच्या अनुषंगाने मतदाराला कोणतीही शंका असल्यास अथवा माहिती हवी असल्यास आपल्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे विचारणा करावी, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी कळविले आहे.

========================================================


========================================================